‘वंचित’मधील ‘आरएसएस’च्या मंडळींना युती नकोय : इम्तियाज जलील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या तोंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितसोबत असलेली युती तोडल्याची घोषणा नुकतीच केली. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील यांनी वंचितमधील आरएसएस मंडळींना एमआयएमसोबत युती नको असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. युती तोडण्यामध्ये आरएसएसच्या मंडळींचा हात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केली.

वंचितकडे एमआयएमने 74 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील आठ जागा आम्हाला देण्यात आल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना एमआयएम पक्षाकडे वोट बँक नसल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे किती वोट बँक आहे दिसून येईल, असे इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच वंचितमधील काही मंडळी मागील काही दिवसांपासून मला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न करीत आसल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, ज्यांच्या तोंडाला जे येईल ते सांगत आहेत. आम्हाला सुद्धा तोंड आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी असा इशारा त्यांनी यावेळी दिला. वंचितला जर काँग्रेस सोबत जायचे होते तर आमच्यासोबत दोन महिन्यापासून बोलण्याचे नाटक का केले. असा सवाल इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला.

You might also like