मल्लिकार्जुन खरगे यांचे कडवे बोल, म्हणाले – ‘RSS आणि BJP विषारी, चाखाल तर मराल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अनेक राज्यांत निवडणुकांचे वारे वाहत आहे. पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांत पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचे दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्येही विधानसभा निवडणुकांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या ( BJP) विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी पुडुचेरी आणि तामिळनाडूतील लोकांना भाजपला राज्यात प्रवेश देऊ नका, असे आवाहन केले आहे. गुरुवारी खर्गे म्हणाले, ‘आरएसएस आणि भाजप विष सारखे आहेत. जर तुम्ही त्यांना चाखाल तर मराल. ते म्हणाले, ‘ते कस तरी कर्नाटकात पोहोचले आहेत. या विषारी विचारसरणीला तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये प्रवेश करू देऊ नका.

दरम्यान, पुडुचेरीच्या 30 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. येथे 5 जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. पुडुचेरी विधानसभेसाठी 10 लाख 2 हजार 589 मतदार आपला उमेदवार निवडतील. त्याचवेळी, तमिळनाडूमधील सत्ताधारी AIADMK विरूद्ध राजकीय लढाईत डीएमके बरोबर काँग्रेस रिंगणात आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. सत्ताधारी पक्ष एआयएडीएमके सत्तेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर, डीएमके दीर्घकाळानंतर सत्ता मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. द्रमुकनेही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाचे प्रमुख स्टालिन यांनी कोलाथूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडूमध्ये जागावाटप
द्रमुकचा मित्रपक्ष काँग्रेस 25 जागांवर निवडणूक लढवेल. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि व्हीसीके यांना 6-6 जागा मिळाल्या आहेत. त्याचवेळी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि कोंगुनाडू मुन्नेत्र कझगम हे 3-3 जागांसाठी निवडणूक लढणार आहेत. यासह, मणिथनेय मक्कल काछी (एमएमके) च्या वाट्याला 2 जागा आल्या आहेत. याशिवाय टीएमके, द फॉरवर्ड ब्लॉक, एटीपी आणि एमव्हीके प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या तारखांनुसार मतमोजणीची प्रक्रिया 2 मे रोजी होणार आहे.