संघ प्रमुख मोहन भागवत म्हणाले – ‘हिंदू धर्माच्या मुळातच देशभक्ती, येथे कुणीही देशद्रोही नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, एकतेत अनेकता, अनेकतेमध्ये एकता हीच भारताची मूळ विचारधारा आहे. पूजा पद्धत, कर्मकांड काहीही असेल, पण सर्वांना मिळून राहायचे आहे. भागवत म्हणाले, अंतर याचा अर्थ फुटीरतावाद नाही.

मोहन भागवत यांनी दिल्लीत ’मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियट – बॅकग्राऊंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, वेगळे होण्याचा अर्थ हा नाही की, आपण एक समाज, एका विश्वाचे सुपूत्र बनून राहू शकत नाही.

पुस्तकाच्या लोकार्पणवेळी संघ प्रमुख म्हणाले, पुस्काचे नाव आणि माझ्या हस्ते प्रकाशन झाल्याने अंदाज वर्तवला जाऊ शकतो की, हा गांधीजींना आपल्या परिने मांडण्याचा प्रयत्न आहे. गांधीजींच्याबाबत हा एक प्रमाणित शोधग्रंथ आहे. परंतु, याच्या प्रकाशन कार्यक्रमाला संघाचे स्वयंसेवक असल्याने लोक याबाबत चर्चा करू शकतात. परंतु असे होऊ नये.

पुस्तकाबाबत मोहन भागवत यांनी म्हटले की, हे पुस्तक मेहनतीने संशोधन करून लिहिण्यात आले आहे. गांधीजींनी एकदा म्हटले होते की, माझी देशभक्ती माझ्या धर्मातून निघते. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, हिंदू आहे तर त्याच्या मुळात देशभक्ती असणारच. येथे कुणीही देशद्रोही नाही. स्वराज्य तोपर्यंत तुम्ही समजू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वधर्म समजू शकत नाही.

मोहन भागवत यांनी म्हटले की, गांधीजी म्हणत असत की, माझा धर्म पंथ नाही तर माझा धर्म तर सर्वधर्माचा धर्म आहे. गांधीजी म्हणत असत, मी माझ्या धर्माला समजून घेतले तर चांगला देशभक्त बनू शकतो आणि लोकांनाही असे करण्यास सांगेन. गांधीजींनी म्हटले होते की, स्वराज समजण्यासाठी स्वधर्म समजून घेतला पाहिजे.