‘मोदी है तो मुमकिन है’, सरसंघचालक मोहन भागवत देखील ‘सहमत’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – वर्षानुवर्षे समाजाने संकल्प करून अथक प्रयत्न केल्यामुळेच कलम ३७० हटवणे शक्य झाले आहे. अर्थात, नेतृत्वाच्या इच्छाशक्तीचे महत्वही त्यामध्ये आहेच. त्यामुळेच मोदी है तो मुमकिन है असे लोक बोलतात ते चूक म्हणता येणार नाही अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णय क्षमतेचे तोंडभरून कौतुक केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात मोहन भागवत आणि इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्राणाची आहूती दिली तसेच ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या सगळ्यांचं स्मरण आज करायला हवंच असेही भागवत म्हणाले. कलम ३७० हटविण्याचा संकल्प हा समाजाचा होता. असे संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे असे शेवटी ते बोलले. संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानला फैलावर घेतले. कलम ३७० हटवल्यानंतर इम्रान खाननं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना हिटलरशाहीशी केली होती. त्यावर भय्याजी जोशी यांनी सडेतोडटिका केली. ते म्हणाले, पाकिस्तानी पंतप्रधानांनी एक प्रकारे संपूर्ण हिंदू समाजाला ललकारले आहे. सरकार याचे योग्य उत्तर देईल.