Video : ‘स्वदेशी’चा अर्थ ‘विदेशी’ वस्तुंवर सरसकट बहिष्कार टाकणे नाही : सरसंघचालक मोहन भागवत

पोलिसनामा ऑनलाईन – चीनच्या कुरापतीमुळे भारतात चीनी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय विदेशी वस्तूंपेक्षा स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासाठी सातत्याने सांगितले जात आहे. असे असतानाच आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ’स्वदेशी वस्तूंचा वापर याचा अर्थ असा नाही की विदेशी वस्तूंवर सरसकट बंदी घालावी. जगभरात ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्याची भारतात कमतरता आहे अशा गोष्टी आपण वापरायला हव्यात. आम्ही त्या वापरणार अशी प्रतिज्ञा करतो’, असेही भागवत म्हणाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या लोकांचे ज्ञान आणि क्षमता याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनुभवावर आधारित ज्ञानाला पुढे आणण्याची आवश्यकता आहे. विदेशी वस्तूंवर केवळ अवलंबून राहू नये. जर तसे करायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या अटी आणि शर्तींवर ही गोष्ट करायला हवी.असेही भागवत यांनी स्पष्ट केले. एक कुटुंब म्हणून जग समजून घेण्याची आणि स्वावलंबनासह सद्भावनेने सहकार्य करण्याची गरज असल्याचंही सांगितले आहे. सहकार्याची गरज अधोरेखित केली. भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या स्वावलंबी भारत अभियानाचे समर्थन करताना सरसंघचालक म्हणाले की स्वदेशी म्हणजे स्वदेशी उत्पादने आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे परंतु याचा अर्थ असा नाही की सर्व विदेशी उत्पादनांवर बहिष्कार घाला. जगात ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घेतल्या पाहिजेत.