राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दहशतवादाचे प्रतीक : काँग्रेस आमदार

रेवा (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने तयार केलेल्या जाहीरनाम्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा शासकीय इमारतीत भरविण्यास मनाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे इतर नेतेही आरएसएसवर टिका करण्यास पुढे सरसावले आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे दहशतवादाचे प्रतीक असलेली संघटना आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार सुंदरलाल तिवारी यांनी केला आहे.

सुंदरलाल तिवारी हे मध्यप्रदेशातील रेवा या ठिकाणचे आमदार आहेत. त्यांनी मंगळवारी संघावर कडाडून टीका केली आहे. एवढंच नाही तर आरएसएस ही अशी संघटना आहे ज्या संघटनेने महात्मा गांधींना ठार केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात द्वेष पसरवण्याचे काम होते आहे. धार्मिक तेढ कशी निर्माण होईल दोन धर्मांमधला बंधुभाव कसा संपेल यावर ते लक्ष केंद्रीत करत आहेत असाही गंभीर आरोप सुंदरलाल तिवारी यांनी केला आहे.

जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केलं जात असल्याने देशात भयानक परिस्थिती : शदर पवार

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची भाषा केली. ज्यानंतर आता काँग्रेसमधले इतर नेतेही टीका करताना दिसत आहे. मात्र मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी थेट राहुल गांधींनाच आव्हान देत तुमचे पणजोबा आणि आजी हे देखील संघावर बंदी आणू पाहात होते मात्र त्यांना ते शक्य झालं नाही असं म्हटलं आहे. या सगळ्या वातावरणात काँग्रेस आमदार सुंदरलाल तिवारी यांनी संघावर कडाडून टीकास्त्र सोडले आहे. या संघटनेने देशाचे काहीही भले केलेले नाही. या संघटनेला फक्त धार्मिक तेढ पसरवण्यात रस आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. आता तिवारी यांनी केलेल्या या वक्तव्यावरून त्यांना भाजपा किंवा संघाच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.