रुग्णालयात घुसून आरएसएस नेत्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार, सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील किश्तवाढ येथील जिल्हा रुग्णालयात घुसून दहशतवाद्यांनी मेडिकल असिस्टंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य चंद्रकांत शर्मा यांच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्यांच्या खाजगी सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर शर्मा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रकांत शर्मा हे तपासणीकरिता स्थानिक रुग्नालयात गेले होते. या दरम्यान काही दहशतवादी रुग्णालयात घुसले. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याकडून शस्त्र हिसकावून घेत गोळीबार केला. यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर नेते चंद्रकांत शर्मा जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांनी आग लावण्याचा देखील प्रयत्न केला. शर्मा हे आरएसएसशी संबंधित आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या प्रकरणी अधिक तपस केला जात आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यानंतर या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.