रा.स्व.संघाची प्रतिनिधी सभा, 15 मार्च रोजी बंगळुरुला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक दिनांक १५मार्च रोजी बंगळुरू येथे होणार आहे, अशी माहिती संघाच्या प्रसिद्धीपत्रकात आज (शनिवारी) देण्यात आली आहे.

संघामध्ये प्रतिनिधी सभेची बैठक ही सर्वोच्च असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वर्षातून एकदा ही बैठक आयोजित केली जाते. त्यामध्ये संघ शाखांचा विस्तार, प्रशिक्षण शिबीरांची संख्या वाढ करणे आणि प्रांतोप्रांतीच्या प्रतिनिधींचे अनुभव आणि नवीन संकल्पना लक्षात घेऊन संघटनात्मक धोरण ठरवले जाते.

दरवर्षी प्रतिनिधी सभेची बैठक तीन दिवसांची असते. यंदा १५ ते १७ मार्च २०२० अशी तीन दिवस ही सभा होत असून त्यात १४०० प्रतिनिधी सहभागी होतील. बैठकीत देशापुढील महत्त्वाचा विषयांवर ठराव संमत केले जातील. महिलांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रसेविका समिती तसेच संघाशी संबंधित अन्य कार्यक्षेत्रातील संघटनांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येते.

सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून सरकार्यवाह भैयाजी जोशी बैठकीचे संचालन करतील अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी पत्रकात दिली आहे.