तुर्कीच्या भेटीबाबत संघाने आमिर खानवर साधला ‘निशाणा’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांची पत्नी एमी एर्दोगान यांनी अभिनेता आमिर खानची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमिरवर निशाणा साधला आहे. आमिर हा चीनमधील सत्ताधारी पक्षाचा लाडका असल्याचा टोला संघाने मुखपत्रामधून लगावला आहे. तसेच भारताविरोधात असणार्‍या देशांबद्दल आमिरच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न या लेखामध्ये उपस्थित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणार्‍या पांचजन्यमधून अभिनेता आमिरवर टीका करण्यात आली आहे. तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच चिनी कंपन्यांची जाहिराती आमिर करत असल्याचे या लेखमध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘ड्रॅगन का प्यार खान’ या मथळ्याखाली छापून आलेल्या लेखामधून आमिरच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या आधी आणि त्यानंतरही देशभक्ती या विषयावर चित्रपट निर्माण झाले. मात्र नंतर चित्रपटांना पाश्चिमात्य संस्कृतीची हवा लागली आणि नेतृत्व करणारा चित्रपट संपला. मागील पाच ते सहा वर्षांमध्ये पुन्हा एकदा देशभक्तीवर आधारित चित्रपटांची संख्या वाढलेली दिसते. मात्र दुसरीकडे असे काही अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत ज्यांना आपल्या देशाबरोबर वैर असणारे चीन आणि तुर्कीसारखे देश जास्त आवडतात, अशा शब्दांमध्ये आमिरवर निशाणा साधण्यात आला आहे. मुस्लिमांच्या उम्मांचा (माता) दूत बनण्यासाठी उत्सुक असणार्‍या तुर्कीच्या राष्ट्रापतींची पत्नी आणि आमिर खान यांची नुकतीच भेट झाली आणि या भेटीचे फोटो समोर आले आहेत, असा उल्लेख लेखामध्ये करण्यात आला आहे.