RTE प्रवेशांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संकटामुळं राज्यातील शाळा बंद असल्यनं आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली आहे. प्राथमिक संचालनालयाकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही आरटीईअंतर्गत अपेक्षित प्रवेश होऊ न शकल्यानं आता प्रवेशनिश्चितीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील मुला-मुलीसांठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागवून 17 मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली. राज्यात आरटीईच्या 9331 शाळांमध्ये एकूण 1 लाख 15 हजार 460 जागा असून त्यापैकी केवळ 53687 जागांवर प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.

कोरोना संसर्गाच्या काळात अनेक विद्यार्थी हे पालकांसह मूळ गावी स्थलांतरीत झाल्यानं प्रवेशनिश्चितीसाठी ते उपलब्ध नाहीत. त्यामुळंच मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती आरटीई समन्वयकांनी दिली. वेटींग लिस्टमधील विद्यार्थ्यांना मात्र यामुळं प्रवेशासाठी आणखी ताटकळत बसावं लागणार आहे.

असे होतील प्रवेश

शाळांनी प्रवेशासाठी ज्या तारखा दिल्या आहेत त्या तारखांनुसारच पालकांनी प्रवेशनिश्चिती करायची आहे. परंतु यावेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर प्रत्यक्ष शाळेत जाणं शक्य नसेल तर आवश्यक कागदपत्रं व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे शाळांना पाठवून तात्पुरते प्रवेश घेण्याची मुभा आहे. ज्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली नाही त्या पालकांशी संपर्क करून प्रवेशनिश्चिती करण्यास सांगण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.