बॅंकांची RTGS सेवा 14 तासांसाठी राहणार बंद, RBI ची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनी ट्रान्सफर करणारी RTGS ही सेवा शनिवारी (दि. 17) मध्यरात्रीपासून 14 तासांसाठी बंद राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. 17 एप्रिल रोजी कामकाज संपल्यानंतर RTGS प्रणालीची क्षमता सुधारण्यासाठी तसेच डिझास्टर रिकव्हरीच्या वेळेत अधिक सुधारणा करण्यासाठी ही सेवा काही काळासाठी बंद ठेवली जाणार असल्याने RBI ने सांगितले आहे. दरम्यान 2 लाख रुपयांपर्यंतच्या देवघेवीसाठी वापरण्यात येणारी NEFT सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, RTGS सेवा शनिवारी (दि. 17) मध्यरात्रीपासून रविवारी (दि. 18) दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहील. सदस्य बँकांनी आपल्या ग्राहकांना त्यानुसार आपल्या व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याची सूचना करावी. RBI ने गेल्या आठवड्यात आपल्या पतधोरणाची समीक्षा केली होती. त्यावेळी RTGS आणि NEFT सारख्या सुविधा अन्य काही संस्थांनाही सुरू करण्याची घोषणा केली होती. या तरतुदीमुळे आरबीआयने फिनटेक आणि पेमेंट कंपन्यांनासुद्धा सेंट्रलाइज पेमेंट सिस्टिमच्या या दोन पर्यायांमध्ये सामील करून घेतले आहे. आतापर्यंत ही सुविधा केवळ बँकांसाठीच उपलब्ध होती. RTGS सुविधा गेल्यावर्षी 14 डिसेंबरपासून 24 तास उपलब्ध आहे. जगात ज्या मोजक्या देशात ही सुविधा 24 तास दिले जाते त्यापैकी भारत हा एक आहे.