RTGS चा वापर करणाऱ्यांनो ध्यानात ठेवा; ‘या’ दिवशी सलग 14 तास उपलब्ध नसेल ‘आरटीजीएस’ची सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बँकिंग व्यवहार करताना ‘रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट’ (RTGS) चा वापर अनेकांनी केला असेल. ही सुविधा 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम पाठवायची असेल तरच वापरता येते. मात्र, आपणही ही सुविधा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण RTGS ही सुविधा येत्या शनिवारी मध्यरात्रीपासून 14 तास उपलब्ध नसेल. याबाबतची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिली आहे.

‘डिजास्टर रिकव्हरी’चा कालावधी आणखी चांगला करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत करण्याच्या उद्देशाने ही सेवा नियोजित कालावधीत उपलब्ध नसेल. तर ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड्स ट्रान्सफर’ (NEFT) च्या व्यवहारात कोणताही बदल केला जाणार नाही. ही सेवा कोणत्याही अडचणींविना सुरु असणार आहे. RTGS सिस्टिम सक्षम बनवण्यासाठी आणि ‘डिजास्टर रिकव्हरी’ कालावधीला आणखी सुविधाजनक बनवण्यासाठी RTGS तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे.

याबाबत RBI ने म्हटले, की RTGS सेवा 18 एप्रिल, 2021 ला रात्री बारा वाजल्यापासून ते रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे बँकांनी त्यानुसार व्यवहारांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी 14 डिसेंबरपासून RTGS ही सुविधा 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

NEFT मध्ये कोणताही बदल नाही

RTGS सेवा 14 तास उपलब्ध नसली तरी त्या कालावधीत NEFT ही बँकिंग सेवा सुरळीत राहणार आहे. त्यामध्ये कोणताही परिणाम होणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.