1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी रुबीनाला न्यायालयाचा दिलासा, मुलीच्या निकाहसाठी 6 दिवसांचा पॅरोल मंजूर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मार्च 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपीपैकी एक आणि मास्टरमाईंड टायगर मेमनची वहिनी रुबीना सुलेमान मेमनला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तीला आपल्या मुलीच्या निकाहला हजर राहण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने 6 दिवसांचा पॅरोल मंजूर केला. न्यायमूर्ति एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ति अभय आहूजा यांच्या खंडपीठासमोर पोलिस बंदोबस्तात 31 डिसेंबर रोजी ही सुनावणी पार पडली.

1993 साली मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आऱोपी टायगर मेमनसोबत कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून टाडा न्यायालयाने रुबीनाला 2006 जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून ती येरवडा मध्यवर्ती कारागृहात (महिला कक्षात) शिक्षा भोगत आहे. 8 जानेवारी रोजी आलिया या आपल्या मुलीच्या निकाहसाठी पॅरोल द्यावा,म्हणून रुबीनाने वकील फरहाना शहामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुट्टीकालीन न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांना आपल्या मुलीच्या लग्नासंबंधित विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किमान 7 दिवसांची रजा मंजूर करावी, अशी विनंती खंडपीठासमोर केली होती.

रुबिना 13 वर्षांहून अधिक काळ येरवडा कारागृहात कारावासाची शिक्षा भोगत आहेत. यापूर्वी त्यांना कधीच पॅरोलवर सोडले नसल्याचेही वकील शहा यांनी खंडपीठाच्या निर्दशनास आणून दिले. तेव्हा, याचिकाकर्त्याच्या वर्तनाबद्दल मध्यवर्ती कारागृहातील राज्य सरकारी वकिलांकडे खंडपीठाने विचारणा केली होती. याचिकाकर्त्याच्या वर्तनाबद्दल पोलिसांचा खंडपीठाकडे अहवाल सादर केला. त्याची दखल घेत मुलीच्या लग्नासाठी मानवतेच्या दृष्टीने याचिकाकर्त्यांची याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आणि पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अधिक्षकांना रुबीना यांना 6 जानेवारी ते 11 जानेवारी या सहा दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्याचे निर्देश दिले. तसेच याचिकाकर्त्यांना 5 जानेवारीपर्यंत 1 लाख रूपये अनामत रक्कम जमा करण्याचे सांगितले. त्यानंतर 12 जानेवारी रोजी पुन्हा येरवडा पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देत सुनावणी 19 जानेवारीपर्यंत तहकूब केली.

12 मार्च 1993 रोजी मुंबईतील 13 विविध ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 257 लोकांचा मृत्यू आणि सुमारे 1400 लोक जखमी झाले होते. या स्फोटांचे मुख्य सूत्रधारांमध्ये याकुब मेमन आणि टायगर मेमन यांचा समावेश होता. 2015 मध्ये याकूब मेमन याला फाशी दिली होती. दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.