उद्यापासून नियमात होणार ‘हे’ बदल, सामान्यांवर थेट होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मार्च महिन्यापासून आर्थिक वर्षाला सुरुवात होते. त्यामुळे काही बाबतीत बदल होत असतात. त्याचा परिणाम थेट सर्व सामान्यांच्या रोजच्या जगण्यातील महत्वाच्या गोष्टींवर होत असतो. यावर्षीही उद्यापासून काही बदल होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हंणजे कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. त्याच बरोबर एलपीजीच्या नव्या किंमती लागू होतील. काही राज्यांमध्ये प्राथमिक शाळा देखील सुरू होत आहेत. उद्यापासून कोणते नवीन नियम लागू होणार आहेत ते जाणून घेऊ…

आजारी, वयस्कर लोकांना मिळणार कोरोनाची लस
कोरोनावरील लसीकरण मोहीम महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस उद्यापासून मिळणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत मिळणार असून खासगीमध्ये काही शुल्क आकारले जाणार आहे.

एसबीआयमध्ये केव्हायसी अनिवार्य
एसबीआय ग्राहकांना केव्हायसी अपडेट करणं अनिवार्य आहे. जे ग्राहक हे केव्हायसी अपडेट करून देणार नाहीत. त्यांना विविध सरकारी योजनांचा किंवा इतर योजनांचा लाभ मिळणार नाही त्यामुळे एसबीआय ग्राहकांनी तत्काळ केवायसी अपडेट करून घ्यावे अन्यथा समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

LPG गॅस सिलेंडरचे दर
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती निश्चित करतात. १ मार्च रोजी या किंमतीत बदल होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात एकूण ३ वेळा तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत.

तीन राज्यात प्राथमिक शाळा उघडणार
उद्यापासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्व प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) उघडणार आहेत. तर हरियाणामध्ये तिसरी ते पाचवीच्या शाळा आधीच उघडल्या आहेत. आता ग्रेड १ आणि २ साठी नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये होणार बदल
विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या आहेत त्यामुळे विजया आणि देना बँकेचे आयएफएससी कोड १ मार्चपासून निष्क्रिय होईल. या बँकांच्या ग्राहकांना उद्यापासून नवीन IFSC कोड वापरावा लागणार आहे. ग्राहकांना या बदलाला सामोरे जावे लागणार आहे. बँकेने याबाबतची पूर्वसूचना ग्राहकांना दिली आहे. हे विलिनीकरण १ एप्रिल २०१९ पासून लागू झाले आहे.