अभिनेता अरबाज खानच्या अटकेची अफवा, चुकीची माहिती पसरविणार्‍याला दिल्लीमधून अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय नेते आणि बॉलिवूडमधील कलाकारांवर समाज माध्यमात खोटे आरोप करुन संभ्रम निर्माण करणाऱ्या विभोर आनंद नामक व्यक्तीस नवी दिल्लीतून सायबर पोलिसांनी अटक केली आहे. विभोर स्वतःस वकील असल्याचे सांगत आहे. यासंदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत..

ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून विभोरने मुंबई पोलीस, राजकीय नेते आणि कलाकारांना निशाणा बनवले होते. तद्वतच ऑगस्ट महिन्यात त्याच्याविरुद्ध एका महिलेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पण त्याने हजर न होता सुशांत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन प्रकरणावरुन पोलिसांसोबत, राजकीय नेत्यांच्या बदनामीचे सत्र कायम ठेवले.

तथापि, कोणत्याही पुराव्यांअभावी विभोरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अरबाज खान, सुरज पांचोली, सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्याविरुद्ध अनेक खोटे आरोप केले. गुरुवारी पोलिसांनी त्याला तांत्रिक पुराव्याच्या आधारे दिल्लीतून अटक केली. शुक्रवारी त्याला मुंबईत आणण्यात आले. त्याचप्रमाणे बनावट खात्याच्या माध्यमातून समाज माध्यमात मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. त्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये विभोरचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अभिनेता अरबाजच्या अटकेची अफवा
दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने अरबाजला अटक केल्याची खोटी माहिती विभोरने युट्युबवर प्रसारित केली होती. त्याप्रकरणी अरबाजाने विभोरविरुद्ध मुंबई न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने विभोर आणि इतर प्रतिवाद्यांना समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह साहित्य काढण्यास सांगितले होते. मात्र, तरीदेखील बदनामी सुरूच होती.