‘चॉईस पोस्टींग’ पाहिजे तर वेगाने पळा ; विश्वास नांगरे पाटील यांची खुली ऑफर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चॉईस पोस्टींगसाठी मोठी कसरत सुरु असते. परंतु नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चॉईस पोस्टींग हवी असल्यास अजब ऑफर दिली आहे. वेगाने धावा आणि पाहिजे असलेल्या ठिकाणी नियुक्ती मिळवा असा आदेश त्यांनी काढला आहे. पहिल्या २५ मध्ये येणाऱ्य़ा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार नियुक्ती देण्यात येणार आहे. परंतु या खुल्या ऑफरसाठी किती पोलीस धावतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सर्वसाधारणपणे ५ वर्षे एकाच पोलीस ठाण्यात किंवा शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बदली करण्यात येते. त्यासाठी त्यांची कार्यक्षमता आणि पात्रता विचारात घेतली जावी असा संकेत आहे. मात्र पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे पोलिसांच्या फिटनेससाठी जागरूक आहेत. त्यांनी पोलीसांच्या सर्वसाधारण बदल्या (जनरल ट्रान्सफर) शारीरिक क्षमतेचा निकष लावला आहे. ५ वर्षांचा कार्यकाल पुर्ण केलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची सर्वसाधारण बदली करताना वेगाने धावा आणि इच्छित ठिकाणी नियुक्ती करून घ्या अशी ऑफर त्यांनी या माध्यमातून दिली आहे. सोमवारी त्यांनी हे परिपत्रक काढले आहे. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांसाठी बदल्यांसाठी हे परिपत्रक आहे. यासाठी वयोगट तयार केले आहेत.

३० च्या आतील कर्मचाऱ्यांसाठी १० किमी, धावण्याची स्पर्धा घेण्यात येणार असून प्रथम क्रमवार ५० जणांना पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे. तर ३० ते ४० वयोगटातील कर्मचाऱ्यांना ५ किमी धावावे लागेल. त्यात क्रमवार येणाऱ्या २५ जणांना पसंतीनुसार नियुक्ती देण्यात येणार आहे. तर ४० ते ५० वयोगटातील कर्मचाऱ्यांना ५ किमी धावावे लागेल. त्यातील क्रमवार २५ जणांना नियुक्ती देण्यात येईल.

गुन्हे शाखा व वाहतुक शाखेला बीएमआयचा निकष

वाहतुक शाखेत असलेले कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. यासाठी गुन्हे शाखा व वाहतुक शाखेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा BMI तपासला जाणार आहे. त्यात पात्र असलेल्यांना गुन्हे शाखा व वाहतुक शाखेत नियुक्ती देण्यात येणार आहे.