अन्यथा भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : रुपाली चाकणकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करण्यात आली आहे. यामुळे देशात आणि महाराष्ट्रात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर राजकीय मंडळींनी मोदी आणि पुस्तक लिहणाऱ्यावर टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याच मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

यापूर्वी नगरचे उपनगराध्यक्ष श्रीपाद छिंदमकडून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, पाठ्यपुस्तकात जिजाऊ माँसाहेबांचा केलेला अपमान आणि आता ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे प्रकाशन यावरून भाजपची छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून घेणारे नरेंद्र मोदी यांनी त्वरीत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

मोदींना कदाचित महाराजांनी सुरतवर गाजविलेल्या पराक्रमाची सल अजून बोचत असावी, म्हणून तसा प्रयत्न करून महाराष्ट्राचा अपमान करण्याची संधी ते शोधत असतात असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध तर आहेच परंतु त्यांनी त्वरित याबाबत जनतेची माफी मागितली पाहिजे. अन्यथा पक्षाच्या महिला पदाधिकारी भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरून फिरू देणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/