RPI च्या महिला आक्रमक, म्हणाल्या – ‘राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’

धायरी: पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे (RPI ) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या पुण्यातील धायरी येथील घरासमोर आरपीआयच्या (RPI ) महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 27) निदर्शने केली. यावेळी चाकणकर यांच्या छायाचित्राला काळे फासून जोडे मारण्यात आले. तसेच यापुढे चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. यावेळी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाकणकरांच्या घराभोवती यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

यावेळी आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्षा संगीता आठवले म्हणाल्या की, लायकी नसणाऱ्या महिलेने केंद्रीय मंत्री आठवले यांच्यावर वक्तव्य केल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. यापुढे रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. संगीता आठवले, नगरसेविका सुनीता वाडेकर, शकीला वाघमारे, संघमित्रा गायकवाड आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आझाद मैदानावरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट संबोधून शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याला मी माझा संवैधानिक अधिकार वापरून निषेध केला होता. घटनेने मला व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जर कुणी अपमान करत असेल तर गप्प बसणे हे माझ्या रक्तात नसल्याचे त्या म्हणाल्या.