पुण्यात रूपाली पाटील यांनी ’असा’ केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पदवीधर मतदारसंघासाठी मनसेच्या रूपाली पाटील यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने आज अनेक उमेदवारांनी धावपळ करत आपले अर्ज भरले. मात्र, रूपाली पाटील यांनी मनसे स्टाइल हटके अर्ज भरल्याने त्यांची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

मनसेची अनेक आंदोलने त्यांच्या हटके स्टाइलमुळे चर्चेत असतात. तीच परंपरा आज उमेदवारी अर्ज भरताना पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रूपाली पाटील यांनी कायम राखली. हजारो कार्यकर्ते सोबत घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याऐवजी त्या एका बेरोजगार पदवीधर तरुणीसोबत विधानभवनात आल्या आणि या तरुणीच्या हाताने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यात आणि देशात सध्या बेरोजगारीची समस्या अतिशय गंभीर स्थितीत आहे आणि याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेच या कृतीतून रूपाली पाटील-ठोंबरे यांनी दाखवून दिले आहे.

यासंदर्भात रूपाली पाटील यांनी सांगितले की, मीसुद्धा मनसेचे 5-10 हजार कार्यकर्ते घेऊन येऊ शकले असते. पण फक्त एका पदवीधर बेरोजगार तरुणीला सोबत घेऊन तिच्याच हस्ते हा निवडणुकीचा अर्ज दाखल केला. कारण मला केवळ आमदार होण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही तर जे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मांडायचे आहे.

तर ज्या तरुणीच्या हस्ते रूपाली पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ती तरुणी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाली की, मी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. पण गेल्या आठ वर्षांपासून मी नोकरीसाठी प्रयत्न करतेय. मला कुठेही नोकरी मिळाली नाही. आता तरी काही मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. या तरुणीच्या आई-वडिलांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच रूपाली ठोंबरे यांनी सातारा येथे जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. शिवाय, त्यांनी आपल्या प्रचारालाही धूमधडाक्यात सुरुवात केली आहे.