‘ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेचं होणार’, मनसेची अमृता फडणवीसांवर ‘खरमरीत’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या ट्विटरवॉर सुरु होते. या वादामध्ये आता मनसेने देखील उडी घेतली आहे. मनसेच्या पुण्याच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील – ठोबरे यांनी आता अमृता फडणवीस यांच्याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रुपाली पाटील – ठोबरे म्हणतात, बाई जरा दमाने घ्या, वास्तविक पाहता ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्यावर पडल्या आहेत, बाई ते ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेंचं होणार त्यात नाव लावण्याचा प्रश्न येतो कुठे ? असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे. तसेच मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता तुम्ही भानावर या काहीही बिनबुडाचे बोलून का स्वतःचा अपमान करून घेता. लवकर शुद्धीत या आणि गणपती बाप्पाला सुदबुद्धि मागा लवकर देईल बाप्पा सुदबुद्धि अशा शब्दात अमृता फडणवीस यांना रुपाली पाटील यांनी टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेनंतर पिंपरी चिंचवड येथे देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत मुख्यमंत्र्यांना चोख प्रतिउत्तर दिले होते.

त्याचप्रमाणे युवा सेना नेते वरून सरदेसाई यांनी देखील ट्विट करत थेट देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. ज्यामध्ये ते म्हणतात गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करायच्या अनेक संध्या दिल्या पण शिवसेनेने कधी ही वैयक्तिक टीका केली नाही कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा असे सुचक विधान सरदेसाई यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

सावरकरांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर चांगलीच टीका केली होती तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकारचे असल्यामुळे शिवसेनेची सावरकरांबाबतची भूमिका काय ? असा सवाल करत भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/