तपास कोण करायचा यात ग्रामीण, पिंपरी चिंचवड पोलिसांमध्ये ‘वाद’ ; २२ दिवस तपास लटकला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात तुम्ही कोठेही गुन्हा नोंदवू शकता असे अति वरिष्ठ अधिकारी मोठ्या तोऱ्यात सांगत असतात. पण एकाच जिल्ह्यात अथवा एखादा आयुक्तालयातील दोन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा कोणी दाखल करुन घ्यायचा अथवा त्याचा तपास कोणी करायचा यावरुन हद्दीतचा वाद घालण्याचा प्रकार अजूनही संपता संपत नाही. ‘शिंगरु मेले हेलपाट्याने’ अशी आपल्याकडे म्हण आहे. तशीच गुन्ह्यांची कागदपत्रे हेलपाटे मारत राहतात. तपास मात्र बोबंलतो, अशी गत अजूनही पहायला मिळत आहे. त्याचेच प्रत्यंतर खेड आणि चाकण पोलीस ठाण्यांमध्ये एका गुन्ह्याबाबत घडली आहे.

एका विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. ३० जून रोजी हा प्रकार घडला होता. पतीने दारु पिण्यासाठी पैसे मागितले असताना आपण त्यांना तुम्ही दारू पिऊ नका तुम्हाला चालता येत नाही असे म्हणाले. त्याचा राग येऊन पती कृष्णा हाळकुंडे यांनी त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना पतीच्या घरी खेड तालुक्यातील शिरोली येथे ३० जूनला सकाळी ९ वाजता घडली होती. २५ वर्षाच्या या महिलेने याबाबतची फिर्याद चाकण पोलिसांकडे दिली.

गेल्या वर्षीपर्यंत चाकण पोलीस ठाणे पुणे ग्रामीण पोलीस दलात होते. आता ते पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात समावेश केला गेला आहे. त्यामुळे दोन पोलीस ठाण्यात हद्दीतचा वाद सुरु झाला. चाकण पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन पिंपरी चिंचवड परिमंडळ १ मार्फत तो पुणे ग्रामीण पोलीस दलाकडे पाठविला. ग्रामीण पोलीस दलाने तो खेड पोलिसांकडे पाठवून दिला.

मात्र, खेड पोलिसांनी तो दाखल करुन घेऊन तपास करण्याऐवजी तो गुन्हा उलट टपाली ग्रामीण पोलिसांकडे पाठवून दिला. तेथून तो पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील परिमंडळ १ व तेथून चाकण पोलीस ठाण्यात पुन्हा परत आला. या गुन्हाच्या कागदपत्राचा प्रवास झाला. शेवटी चाकण पोलिसांनी काल गुन्हा पुन्हा दाखल करुन घेतला. या सगळ्यात तब्बल २० ते २२ दिवस गेले. तोपर्यंत या गुन्ह्यात काहीही तपास होऊ शकला नाही.

त्यामुळे पोलीस दलाकडून ऑनलाईन तक्रार नोंदणी, घरबसल्या तक्रार नोंदविता येणार, सीसीएनटी, सर्व तक्रारी ऑनलाईन घेतल्या जाणार अशा अनेक घोषणा केल्या जातात. पण, एक गुन्हा रितसर नोंदवून घेऊन त्याचा तपास सुरु व्हायला अजूनही २० ते २२ दिवस जातात, हे वास्तव आहे.