जेजुरीहून पळवून नेलेली दीड वर्षाची मुलगी ग्रामीण पोलिसांनी केली आईच्या स्वाधीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तब्बल ७ दिवसानंतर ही मुलगी सापडली आहे. मुल होत नसल्याने एका जोडप्याने या मुलीचे अपहरण केले होते.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, लिला ऊर्फ सुरेखा विनोद भैसारे (वय ३५, रा. जेजुरी) या तिची लहान मुलगी जान्हवी विनोद भेसारे (वय दीड वर्षे) हिला घेऊन नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी एस टी बसस्टँडला जात होत्या. त्यावेळी कोणीतरी त्यांची नजर चुकवून मुलीला पळवून नेले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर एका पल्सरवरील संशयितावर पोलिसांनी सर्व लक्ष केंद्रीत केले. आरोपीचे फोटो बनवून त्याआधारे बातमीदारांमार्फत चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा या आरोपीचे नाव सागर पांडुरंग खरात (मुळ गाव माळेगाव बुद्रुक, ता. बारामती, सध्या रा. कोलवडी ता. हवेली) असे असल्याचे समजले. तो हडपसर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला हडपसर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर जान्हवी हिला कोलवडी येथे पत्नीकडे ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी कोलवडीस जाऊन जान्हवीला ताब्यात घेतले व तिच्या आईच्या स्वाधीन केले.

लग्नाला ७ वर्षे झाल्यानंतरही मुलबाळ होत नसल्यामुळे मुलगी चोरण्याचे उद्देशाने जेजुरी बस स्टँडवर पाळत ठेवून त्यांनी पळवून नेले होते. सात दिवसानंतर मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील या पथकाला बक्षीस जाहीर केले आहे. पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार चंद्रकांत झेंडे, मोरेश्वर इनामदार, राजू पुणेकर, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, राजू मोमीन, प्रमोद नवले, पुनम कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.