रशियाच्या ‘कोरोना’ लसीची अमेरिकेनं उडवली खिल्ली, म्हणाले – ‘माकडाच्या लायकीचीही नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील पहिली कोरोना लस बनवल्याच्या दाव्यानंतर आता रशियाला उर्वरित जगाला देखील ही लस बनवण्यास मदत करायची आहे. रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी कोरोना विषाणूच्या लसी संदर्भात अमेरिकेच्या ऑपरेशन वार्प स्पीडला पाठिंबा दर्शवला आहे. कोरोनाचे उपचार व प्रभावी लस जलदगतीने लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अमेरिकेने ऑपरेशन वार्प स्पीड एजन्सीची स्थापना केली आहे.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेने रशियाकडून कोणतीही वैद्यकीय मदत घेण्यास नकार दिला आहे. एका वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याने सांगितले की, ‘अमेरिका बर्‍याचदा रशियाबाबत संशयी असते आणि मला वाटते की लस, चाचणी आणि उपचारांसारख्या तंत्रज्ञानावर आमची मदत न घेणे हा त्याच अविश्वासाचा परिणाम आहे.’

व्हाईट हाऊसची प्रेस सेक्रेटरी कायले मॅकनेनी यांनी म्हटले की, अध्यक्ष ट्रम्प यांना रशियन लसीबद्दल माहिती देण्यात आली आहे. मॅकनेनी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातील कडक चाचणी व उच्च मापदंडांमधून जावे लागते. अमेरिकेच्या अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेने रशियाच्या अर्धवट लसीला कधीही गंभीरपणे घेतले नाही. अमेरिकेचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी म्हणाले, ‘रशियाने तयार केलेली लस आम्ही माकडांवर वापरतो.’

तर रशियन अधिकारी असे म्हणतात की, ते त्यांच्या लसीविषयी माहिती शेअर करण्यास तयार आहेत. याद्वारे अमेरिकन औषधनिर्माण संस्था त्यांच्या देशातही रशियाची लस बनवू शकतात. रशियाने आधीच सांगितले आहे की, अमेरिकेच्या काही कंपन्यांनी रशियाच्या लसीबद्दल जाणून घेण्यास रस दाखवला आहे, परंतु त्यांनी या कंपन्यांचे नाव घेतले नाही.

रशियाचे म्हणणे आहे की, अमेरिकेने आमच्या लसीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. स्पुतनिक व्ही लस अनेक अमेरिकन लोकांचा जीव वाचवू शकते. एका वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याने सांगितले, ‘जर आमची लस सर्वात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले तर अमेरिकेवर प्रश्न उपस्थित केला जाईल की, त्यांनी या पर्यायाचा सखोल विचार का केला नाही. लसीवरून राजकारण का केले गेले?’

अमेरिकन सरकारचे सल्लागार आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेने रशियाच्या कोरोना लसीचे कोणतेही नमुने मागितले नाहीत. या लसीवर प्रश्न विचारत ते म्हणाले की, रशियामध्ये आता इतका आजार आहे की ते सहजपणे त्यांच्या लसीची क्लिनिकल चाचणी करू शकत होते, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणात ते केले नाही.

अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, ‘लसीची कोणतीही चाचणी घेण्यात आलेली नाही. या लसीवर त्यांनी फारच कमी काम केले आहे. मानवी चाचणी देखील फारच कमी लोकांवर करण्यात आली आहे. त्यामुळे ही लस मोठ्या लोकसंख्येवर प्रभावी सिद्ध होईल की नाही हे सिद्ध होत नाही. हा डेटा पूर्णपणे असुरक्षित आणि अपुरा आहे.’

अमेरिकन प्रशासनाच्या आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रशियाच्या लसीची खिल्ली उडवत म्हटले की, रशियाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केलेली नाही, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना किंवा अमेरिका दोघेही ते गांभीर्याने घेत नाहीत. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना रशियाच्या लसीपेक्षा चीनच्या लसीवर जास्त विश्वास आहे.

अमेरिकन सरकारच्या सल्लागाराने म्हटले, ‘लस शर्यतीत चीन विजयाच्या सर्वात जवळ आहे. लस तपासणीसाठी चीन अधिक गंभीर आहे आणि संपूर्ण जबाबदारीने आपली भूमिका पार पाडत आहे.’

अमेरिकन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, सद्य परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी रशियाने घाईत ही लस लाँच केली आहे. कोरोना विषाणूमुळे पुतीन यांच्यावर जनतेचा खूप जास्त दबाव होता. एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘लसीच्या प्रभावाबद्दल तिथे पुतीन यांना प्रश्न विचारण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही.’