Coronavirus Vaccine : ऑक्टोबरपासूनच ‘कोरोना’ वॅक्सीन दिली जाणाार, सर्वप्रथम डॉक्टर अन् शिक्षकांना मिळणार, रशियाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील शेकडो समूह कोविड-१९ ची लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु रशिया, यूके, अमेरिका आणि चीनची प्रत्येकी एक लस आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा विश्वास आहे की, ही लस पुढच्या वर्षीपर्यंत उपलब्ध होईल, परंतु सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागेल. मात्र रशियाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे की, ते ऑक्टोबरपासूनच देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करणार आहेत. याअंतर्गत डॉक्टर आणि शिक्षकांना प्रथम लस दिली जाईल, त्यानंतर आपत्कालीन सेवांशी संबंधित लोकांचा क्रमांक असेल.

रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, कोरोनाची लस ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी उपलब्ध होईल. ते म्हणाले की, गामालेया संस्थेने कोरोना लसीवरील सर्व क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि निकाल चांगले आहेत. सध्या लस नोंदणी आणि वितरण प्रक्रियेत आहे. ते म्हणाले की, आम्ही ऑक्टोबरपासून लसीकरण सुरू करू. प्रथम लस डॉक्टर आणि शिक्षकांसाठी उपलब्ध करुन दिली जाईल. मिखाईल यांच्या म्हणण्यानुसार, ही रशियन लस ऑगस्टच्या अखेरीपर्यंत मंजूर होईल.

बर्‍याच लोकांनी चिंता व्यक्त केली
अनेक देशांच्या शास्त्रज्ञांनी रशियाच्या या घाईबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की रशियाने जगातील सर्वोत्तम आणि बळकट देश म्हणून प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत लसीची चाचणी घाईघाईने पूर्ण केली आहे.

अमेरिकन कोरोना तज्ञ अँथनी फौची म्हणाले की, रशिया किंवा चीनमध्ये बनवलेली लस अमेरिका वापरू शकणार नाही, कारण आमच्याकडील कायदे आणि विशेषत: क्लिनिकल चाचण्यांशी संबंधित कायदे या दोन देशांपेक्षा खूपच कठोर आणि वेगळे आहेत. कदाचित ही लसी आमच्या सिस्टममध्ये पास होणार नाही. ते म्हणाले की, मला आशा आहे की चीन-रशियाला विषाणूचे गांभीर्य समजत असेल आणि क्लिनिकल चाचण्या घाईघाईने पूर्ण केल्या नसतील. यापूर्वी अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने रशियन हॅकर्सवर कोरोना लसीशी संबंधित डेटा चोरी करण्याचा आरोप लावला होता.