रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांच्या कट्टर विरोधकास 3.5 वर्षांची शिक्षा, हिंसाचार घडल्याची शक्यता

मॉस्को : पोलीसनामा ऑनलाइन – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधी अ‍ॅलेक्‍सी नवलनी यांना पॅरोलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. येथील एका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून, त्यानंतर रशियात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

तत्पूर्वी, नवलनी यांच्यावर विषारी पदार्थाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यांच्यावर जर्मनीत उपचार सुरु होते. गेल्या महिन्यात रशियात परतल्यापासून नवलनी अटकेत आहेत.

पुतीन हल्लखोर –

न्यायालयात सुनावणीवेळी बोलताना नवलनी म्हणाले, राष्ट्रपती पुतीन यांनी आपल्याला विष दिले असून, ते आपल्यावरील हल्ल्याप्रकरणी दोषी आहेत. नवलनी यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या समर्थनात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी जवळपास तीनशे समर्थकांना ताब्यात घेतले.

न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आम्ही अपील करणार आहोत, असे नवलनी यांचे वकील म्हणाले. तर नवलनी यांना शिक्षा सुनावल्यानंतर इंग्लडचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी, हा निर्णय अनुचित असल्याचे म्हटले. अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी रशियाच्या या न्यायालयाच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. या प्रतिक्रियांनंतर रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या मारिया जखारोवा यांनी, पश्चिमेकडील देशांनी आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे. कुठल्याही सार्वभौम राष्ट्राच्या अंतर्गत विषयात लक्ष देणे योग्य नाही, असे स्पष्ट केले.