‘कोरोना’च्या नियमांचा आला वैताग, प्रेमी युगुलांनी मेट्रोतसुरू केलं…

मास्को : वृत्तसंस्था – गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क आदी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आता नागरिकांना वैताग आला आहे. आणखी किती महिने नियम पाळायचे असा सवाल हे नागरिक उपस्थित करत आहेत. या नियमांना कंटाळलेल्या रशियातील प्रेमीयुगलांनी तर मेट्रोमध्ये चुंबन घेऊन अनोख्या प्रकारे या नियमांचा निषेध केला आहे. प्रियकर- प्रेयसीच चुंबन घेऊन निषेध करणाऱ्या तरुण-तरुणींनी सरकारच्या विसंगत धोरणांकडे लक्ष वेधले आहे.

रशियाच्या Yekaterinburg शहरातील मेट्रोमध्ये तरुण-तरुणींनी चुंबन घेऊन निषेध नोंदवला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला धोका पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, असे नियमांचा निषेध करणाऱ्या तरुण- तरुणींनी लाईफ नावाच्या संकेतस्थळाशी संवाद साधताना सांगितले आहे. रशियाच्या संगीत विश्वातले बरेचजण कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना विरोध करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कॉन्सर्ट्स, रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा धोका जास्त असल्याचे सरकारला वाटते. नाईट क्लब्ज आणि इव्हिनिंग शोज बंद ठेवले आहेत. पण मेट्रोमध्ये गर्दी आहे. त्या गर्दीतून नागरिक प्रवास करत आहेत. मात्र त्याबद्दल सरकारला काहीच वाटत नाही. मेट्रोतील गर्दीमुळे कोरोना पसरण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

कोरोना संकटाचा मोठा फटका संगीत क्षेत्राला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगितिक कार्यक्रम करण्यासाठी बंदी आहे. त्यामुळे जगातील संगीत क्षेत्राचं कंबरडं मोडले आहे. संगीत विश्वातून अनेक जण कोरोना नियमांचा निषेध करत आहेत. त्याला तरुणाईचाही पाठिंबा मिळत आहे.