रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीची भारतात ‘एन्ट्री’, डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजकडे जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – औषध नियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतर रशियाने विकसित केलेली स्पुटनिक व्ही कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल झाली आहे. या लशीच्या भारतातील मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. या चाचण्या भारतात पार पाडण्याची जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्वीकारली आहे.

स्पुटनिक व्ही लशीची रशियाने ऑगस्ट महिन्यात नोंदणी केली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये या लशीच्या चाचण्या सुरू झाल्या. मात्र त्याआधीच तिच्या वापराबद्दलची परवानगी रशियाच्या औषध नियंत्रकांनी दिली होती. अशी परवानगी मिळविणारी ही जगातील पहिली लस आहे. स्पुटनिक व्ही लशीचा पहिला डोस रशियातील स्वयंसेवकांना दिल्यानंतर २१ दिवसांनी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या स्वयंसेवकांमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले होते. स्पुटनिक व्ही लशीचा कोणताही दुष्परिणाम अद्याप आढळलेला नाही, मानवी चाचण्यांत ही लस ९२ टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले होते.

दरम्यान, कोरोना लस उपलब्ध होण्याआधीच या रोगाविरोधात मोठी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा प्रसंगी कदाचित लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावीशी वाटणार नाही, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

चाचण्यांचे निकाल परस्परविरोधी
न्यूयॉर्क : एकाच दिवशी माझ्या चाचणीचा निकाल दोन वेळा सकारात्मक आला व त्याच दिवशी दोन वेळा चाचणी नकारात्मक आली. असं दावा करत टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी ट्विटरद्वारे कोरोना चाचण्यांच्या अचूकतेबद्दल प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, चार वेळा कोविडसाठी चाचणी केली. दोन चाचण्या नकारात्मक, तर दोन सकारात्मक निघाल्या. यंत्र तेच, चाचणी तीच, तीच परिचारिका. रॅपिड अँटिजन टेस्ट फ्रॉम बीडी, असे मस्क यांनी म्हटले. बहुधा त्यांना बेक्टन डिकिन्सन अँड कंपनीच्या रॅपिड अँटिजन चाचणीबद्दल म्हणायचे असेल.