‘या’ गर्भश्रीमंतानं पैसा अन् हत्याराच्या जीवावर करायला लावल्या 8 लाख हत्या, 25 वर्षापासून फरार असलेल्याला अटक

किगली /रवांडा : वृत्तसंस्था – जवळपास 25 वर्षापूर्वी रवांडामध्ये एक नरसंहार झाला होता. 1994 मध्ये देशात एक हेट कँपेन सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढच्या 100 दिवसांमध्ये किमान 8 लाख लोकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या नरसंहारातील आरोपी आणि जगातील मोस्ट वाँटेड असलेला उद्योजक फेलिसिन काबुगाला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षापासून त्याचा शोध सुरु होता अखेर फ्रान्समधून त्याला ताब्यात घेण्यात आलं.

एकेकाळी रवांडातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या फेलिसिनला शनिवारी पॅरिसमधून अटक करण्यात आली. फ्रान्सच्या जस्टिस मिनिस्ट्रीने सांगितले की, बनवाट ओळखपत्राच्या आधारे तो पॅरीसमध्ये एका फ्लॅटमध्ये रहात होता. आफ्रिकेच्या या मोस्ट वाँटेडला संयुक्त राष्ट्र संघाच्या इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रायब्यूनल फॉर रवांडाने 1997 मध्ये नरसंहार, त्यात मदत केल्याचे आरोप केले होते. अमेरिकेनं देखील त्याच्यावर 5 मिलियन डॉलर्सचं बक्षिस ठेवलं होतं.

फेलिसिन काबुगा पॅरिसजवळ आपल्या मुलांसोबत 3 ते 4 वर्षे राहिला होता. फ्रांन्सच्या सुरक्षा एजन्सीने सांगितले की, दोन महिन्यापूर्वी त्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याचा पुन्हा शोध सुरु करण्यात आला होता. असे मानले जाते की तो यापूर्वी जर्मनी, बेल्जिअम, केनिया, स्वित्झर्लंड या देशांमध्ये लपून बसला होता.

रवांडामध्ये तुत्सी समाज अल्पसंख्यांक असूनही हुतूपेक्षा जास्त पॉवर त्याच्याकडे होती. मात्र 1959 मध्ये इथ उलथापालथ झाली. तुत्सीचं राज्य गेलं आणि हजारो लोकांना इतर देशांमध्ये शरण जावं लागलं. 1990 मध्ये यातील काही लोकांनी विद्रोह केला आणि रवांडन पॅट्रियाटिक फ्रंट तयार करून रवांडावर हल्ला केला. शेवटी 1993 मध्ये शांती करार करण्यात आला. पण त्यानंतर वर्षभरात सगळंच चित्र बदललं.

तत्कालीन राष्ट्रपती जुवेनल हबयरिमना यांच्या विमानावर 6 एप्रिल 1994 रोजी हल्ला झाला. त्यात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. हुतू कट्टरपंथीयांनी या हल्ल्यामागे आरपीएफ असल्याचा आरोप केला. तर आरपीएफनं हुतुंनीच विमानावर हल्ला करून लोकांची हत्या करण्यासाठी कारण शोधलं असा आरोप केला. दरम्यान विरोध करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या कुटुंबांना संपवण्यास सुरुवात केली. लोकांचे ओळखपत्र पाहून हत्या करण्यात येत होती.

महिलांना या ठिकाणी सेक्स स्लेव म्हणून ठेवलं जात होतं. रेडिओ स्टेशन्स, न्यूजपेपरमधून हेट कँपेन चालवलं जात होते. पादरी, नन हे देखील लोकांच हत्या करून चर्चमध्ये आसरा घेत होते. एवढच नाही तर पती पत्नी एकमेकांचा जीव घेत होते. कारण त्यांना धमकी दिली जायची तुम्ही असं केलं नाहीत तर तुम्हाला जिवंत ठेवले जाणार नाही. फक्त तुत्सी नाही तर हुतु जे वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना देखील मारुन टाकले जात होते.