…अन् त्या दोघा कर्मचार्‍यांनी थेट पोलिस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांनाच रोखलं, नंतर झालं असं काही…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत जमावबंदी केली आहे. जमावबंदीत बंदोबस्तावरील दोघे पोलीस महाद्वार चौकात शुक्रवारी रात्री (दि. 9) भाविकांची गर्दी हटवत होते. इतरांप्रमाणे त्यांनी एका आलिशान मोटारीतील महिला व चालकालाही हटकले. मॅडम, जमावबंदी आदेशात गाडी कुठं फिरवताय. दंडाची पावती करा, नाही तर तुमच्यावर कारवाई करतो, असा दमच दिला. पण नंतर त्या मॅडम म्हणजे स्वत: महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व चालक पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघा पोलिसांचीही भंबेरी उडाली बलकवडे दांपत्याने त्या दोघांचे प्रामाणिक कर्तव्याबद्दल कौतुक करून त्यांना रिवाॅर्ड जाहीर केले.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संजय मासरणकर व शहर वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल संजय महेकर यांच्या या प्रामाणिक कर्तव्याची सध्या पोलीस दलात चर्चा रंगली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत जमावबंदी केली. शुक्रवारी रात्री श्री अंबाबाई देवीची मंदिर आवारातच पालखी झाली. भाविकांनीही महाद्वारातूनच दर्शन घेतले. त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले मासरणकर आणि महेकर यांनी परिसरातील गर्दी हटवली. रात्री सव्वादहाला त्यांनी काळ्या रंगाच्या मोटारीलाही पुढे जाण्यास रोखले.

मॅडम कुठे फिरताय, जमावबंदी आहे असा जाब विचारला. त्यानंतर मॅडमनी चेहऱ्यावरील स्कार्प काढला व शेजारी साहेब बसल्याचे सांगितले. चालकाने मोटारीची काच खाली केली. तर समोर अधीक्षक शैलेश बलकवडे दिसताच दोघांचीही भंबेरी उडाली. दोघांनीही साहेबांना सॅल्युट केला. साहेब आणि मॅडम यांनी मोटारीतून उतरुन प्रामाणिकपणे उत्कृष्ट, कर्तव्य बजावणाऱ्या दोघां पोलिसांच्या पाठीवर थाप मारून कौतुक केले. त्या दोघा पोलिसांचे प्रामाणिक कर्तव्य अधीक्षक बलकवडे व आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दूरवर थांबून किमान 25 मिनिटे मोटारीतूनच टिपले होते. दोघा पोलिसांची जणू त्यांनी परीक्षाच घेतली. दोघेही कर्तव्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने साहेब खूष झाले. त्यांनी पुढे जाऊन वायरलेसवरुन नियंत्रण कक्षाला कळवून महाद्वार चौकातील दोघाही पोलिसांना प्रामाणिक कर्तव्याबद्दल रिवॉर्ड जाहीर केल्याचे कळवले.