‘महाराष्ट्र सरकारविरूध्द भुंकणार्‍यांना व चिवचिवाट करणार्‍यांना सरकारी कवचकुंडले’, ‘सामना’तून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता येते आणि जाते, पण राज्य आणि देश टिकायला हवा. माणसे जगली तर राज्य टिकेल. म्हणून सर्व कामे बाजूला ठेवून सरकारने माणसे जगविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, विरोधकांनी माणुसकीशून्य राजकारण नव्याने सुरू केले. भारतीय जनता पक्षासारखे लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवीत असल्याची जोरदार टीका शिवसेनेने केली आहे. सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य करताना शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकार व भाजपला खडेबोल सुनावले आहे.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारची शनिवारी (दि. 28) वर्षपूर्ती झाली. वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांकडून सातत्याने आरोपच होत राहिले. बरेच राजकीय वादविवादही झडले. या सगळ्या गोष्टींचा समाचार घेताना शिवसेनेने भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. विरोधी पक्ष मंत्रालयाच्या पायरीवर वर्षभरापासून उभा आहे व पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल. पायरी खचेल, पण तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार नाही. त्यामुळे विरोधकांनी कर्तव्याचे भान ठेवून विधायक कार्याचा मार्ग स्वीकारावा व चार वर्षांनंतर निवडणुकांना सामोरे जावे. विरोधी पक्ष सरकार खेचण्याचे जे डावपेच आखत आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून राजकारण करणे हे धोकादायक आहे. अशा यंत्रणांचा गैरवापर करून सरकारे पाडणे अथवा बनवणे म्हणजे हुकूमशाहीचेच लक्षण आहे. महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले पुरविली जात आहेत. त्यांच्या बेकायदा कृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी न्यायव्यवस्थेच्या चिंधड्या उडवून हवे ते केले जात असेल, तर इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीविरुद्ध बोलण्याचा हक्क भाजप पुढाऱ्यांना नाही. महाराष्ट्राची तसेच मुंबईची बदनामी करणाऱ्यांचे खुले समर्थन या काळात विरोधकांनी करावे हे छत्रपती शिवरायांचे दुर्दैवच म्हणावे लागेल अशी खंत सेनेने व्यक्त केली आहे.

वर्षपूर्ती झाली, आता अशीच 4 वर्षे निघून जातील
आज दिल्लीत शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने धडक मारली. सरकार विरुद्ध शेतकरी असा भयंकर संघर्ष दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांना मागे रेटत आहे. त्यासाठी बळाचा वापर केला जात आहे. पण हेच ते सरकार लडाखच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना मागे रेटण्यात कमजोर पडले आहे. दिल्लीत शेतकऱ्यांना तुडवून बाहेर फेकले जात आहे. अशा प्रवृत्तीशी लढत आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे आहे. राज्याची आर्थिक कोंडी केली गेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे बळ वापरून महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांना जेरबंद करायचे. यातून मंत्रालयाच्या पायरीवरून पुढे सरकता येईल, असे विरोधकांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. सरकारची वर्षपूर्ती झालीच आहे. अशीच चार वर्षेही पूर्ण होतील. महाराष्ट्राच्या ते हिताचेच आहे, असं शिवसेनेन म्हटलं आहे.

You might also like