‘आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत, आमच्या भेटीनंतर ‘सामना’नं पुन्हा अग्रेलख लिहावा’

पोलिसनामा ऑनलाईन – आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत असून आमची भूमिका मुख्यमंत्र्याकडे मांडू. भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचे समाधान होईल. त्यानंतर सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट आणि ’सामना’तील अग्रलेखावर भाष्य केले आहे. कोणत्या बदल्यांसाठी आम्ही आग्रही नाहीत. तर महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत ही अपेक्षा आमची आहे. त्यासाठी आम्ही बैठक मागत आहोत. खाटेचे कुरकुरण आधी ऐकून तर घ्यावे. ते ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे समाधान होईल. आज-उद्या मुख्यमंत्री भेटतील.

आम्ही आमचे म्हणणे मांडू. त्यानंतर ’सामना’ने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे चुकीचा संदेश आमच्याबद्दल जातोय आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहोत, आघाडीबरोबर राहणार आहोत. त्यामुळे आम्हाला चर्चा करायची आहे आणि राज्याचे प्रमुख, आघाडीचे प्रमुख या नात्याने त्यांनी ऐकून घ्यायला हवे, मला खात्री आहे की आमचे म्हणणे ऐकल्यानंतर ते समाधानी होतील. राज्याच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय आम्हाला अपेक्षित आहेत. त्यासाठी आम्हाला भेट घ्यायचे आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.