सचिन आणि सेहवाग यांचा ‘हा’ विक्रम हिटमॅन, गब्बरने टाकला मागे

माऊंट माउंगानुई : वृत्तसंस्था – पहिला वन डे आरामात खिशात टाकल्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी भागीदारी करून भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ‘हिटमॅन’ रोहित व ‘गब्बर’ शिखर यांनी तो निर्णय सार्थ ठरवताना पहिल्या विकेटसाठी १४ वी शतकी भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडला.

रोहित आणि शिखर धवन या दोघांनी अर्धशतक झळकावत शतकी भागीदारी केली. रोहितने षटकार खेचून कारकिर्दीतले ३८ वे अर्धशतक झळकावले. त्यापाठोपाठ शिखरनेही २७ वे अर्धशतक झळकावले. रोहित व शिखरची ही १४  वी शतकी भागीदारी ठरली. यासह या दोघांनी भारताकडून सर्वाधिक शकती भागीदारी करणाऱ्या जोडींमध्ये चौथे स्थान पटकावले. त्यांनी तेंडुलकर व सेहवाग यांचा १३ शतकी भागीदारींचा विक्रम मोडला.

मात्र, त्याचवेळी सचीन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली हे २१ शतकी भागीदाऱ्यांसह प्रथम क्रमांकावर आहेत़ त्यापाठोपाठ हेडन -गिलकिस्ट १६ आणि ग्रीनिज -हेन्स १५ शतकी भागीदाऱ्याकडून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

रोहित आणि शिखर यांचा आताचा फॉर्म आणि त्यातील सातत्य लक्षात घेता ते आणखी काही वर्षे नक्कीच भारताचे ओपनिंग बॅटमन्स म्हणून डावाची सुरुवात करतील. त्यामुळे त्यांना सचिन, सौरभचा विक्रम मोडायची संधी आहे.