लासलगांव : मोकाट जनावरांच्या समस्येबाबत सचिन होळकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – नामांकित कृषी तज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी लासलगाव व परिसरातील मोकाट जनावरांच्या समस्येबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात लासलगाव शहर तसेच परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने अनेकांचे प्रपंच शेतीवर चालतात. गेल्या काही वर्षांपासून लासलगाव परिसरामध्ये मोकाट गायी, वळू, वासरे यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील अशा मोकाट जनावरांची संख्या पाचशे हजाराच्या आसपास असण्याची शक्यता असून जनावर 50- 50 च्या टोळक्याने शेतात येतात आणि उभ्या पिकाची संपूर्ण नासाडी तसेच नुकसान करतात. त्यांना हुसकावण्यासाठी जाणाऱ्यांवरदेखील ते हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका हल्ल्यात लासलगाव येथील एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता.

शेतीप्रमाणेच शहरातील दुकानदारांना, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाहनांना, भाजीपाला मार्केटमध्ये तसेच शहरांमधिल वाहतुकीला प्रचंड अडथळा अशी जनावरे निर्माण करतात. छोटे-मोठे अपघात नियमित घडत असतात. यापूर्वी होळकर यांनी स्थानिक प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. तसेच वृत्तपत्र आणि इतर माध्यमांद्वारे या समस्येबाबत प्रसिद्धी दिली. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. म्हणून सदरचे निवेदन देण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी निवेदनाची त्वरित दखल घेऊन जिल्हा परिषद यांना सदर प्रश्नी आदेश देण्याची कार्यवाही केली. तसेच ही समस्या लवकर सोडण्यात येईल असे सचिन होळकर यांना आश्वासन दिले.

या निवेदनासोबत लासलगाव आणि परिसरातील जवळपास 100 ग्रामस्थांच्या तसेच त्रस्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हाधिकारी व्यतिरिक्त सदर निवेदनाची प्रत लासलगाव ग्रामपंचायत, तहसीलदार निफाड, ग्राम विकास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, यांना देखील देण्यात येणार आहे.