‘भारतीय संविधान’चा अपमान करणार्‍या प्रवीण तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’

 मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन  –   गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना मूर्तीखाली भारताचे संविधानाची प्रत ठेवल्याने दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे हे सोशल मीडियावर ट्रोल झालेत. अनेकांनी तरडेंवर टीकेस्त्र सोडले आहे. त्यानंतर प्रवीण तरडेंनी त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट केली आणि आपल्या हातून चूक झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, हा वाद मिटलेला नाही. प्रवीण तरडे यांना महाराष्ट्रामध्ये फिरु देणार नाही, असा थेट इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (खरात) दिला आहे.

दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी जाणूनबुजून भारतीय संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रतवर गणपती बसवून लोकशाहीचा अपमान केलाय. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी, ही विनंती, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

सचिन खरात यांनी या ट्विटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराज देसाई यांना नमूद केलं आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागलं आहे. प्रवीण तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही खरात यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिलाय.

नेमकं काय घडलं होतं?

दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीसाठी आरास म्हणून पुस्तकांचे मनोरे रचले. यावेळी गणपतीच्या मूर्ती पाटावर ठेवली. मात्र, याच पाटाखाली भारतीय संविधानची प्रत ठेवले आणि याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळेच या वादाला तोंड फुटले आहे. एका फेसबुक युजरने प्रवीण तरडेंना केसांची वाढ झाल्याने मेंदूची वाढ खुंटली असेल, अशी टीका केलीय. तसेच गणपती बाप्पा प्रवीण तरडेंना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना करत तरडेंना टोला हाणालाय. देशाच्या संविधानाचा अपमान केल्यावरून तरडे ट्रोल झालेत. प्रवीण तरडेंनी मुद्दामहून असा खोडसाळपणा केल्याचा देखील आरोप होत आहे.

प्रवीण तरडे काय म्हणाले?

सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी आपल्या हातातून झालेली चूक मान्य केली आहे. तसेच प्रवीण तरडे व्हिडिओ शेअर करत म्हणाले, मी माझ्या घरी यंदा पुस्तक बाप्पा अशी संकल्पना केली होती. पण, यावेळी माझ्याकडून चूक झाली आहे. गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली भारतीय संविधान ठेवलं होतं. कारण, गणराय हा बुद्धीचा आणि कलेचा दैवता आहे. त्यामुळे अशी माझी भावना होती. पण, ती खूप मोठी चूकीची होती. ही चूक मला अनेकांनी फोन करुन निदर्शनास आणून दिली, असेही प्रवीण तरडे यांनी सांगितले. यानंतर मी माझी चूक सुधारली असून पुन्हा अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही प्रवीण तरडे यांनी दिलीय.