2 लाखाच्या लाचेची मागणी केल्यानंतर 50 हजाराची दक्षिणा घेणारा पोलिस सचिन कुबेर जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एसीबीने रेड मारत 50 हजार रुपयांची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले आहे. त्याने 2 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. यामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सचिन कुबेर जाधव (वय 37) असे पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई सचिन जाधव हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कर्तव्यास आहेत. वाकड पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक होती. दरम्यान यातील तक्रार याच्यावर व कुटुंबावर भादवी कलम 498 (अ) नुसार गुन्हा दाखल आहे. यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मंजूर आहे. पण, यात अटकेची कारवाई करून जामीनावर सोडण्यासाठी व दोषारोपपत्र लवकर पाठवण्यासाठी लोकसेवक सचिन यांनी प्रथम तक्रारदार यांच्याकडे 2 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार या लाचेची पडताळणी केली. त्यात 2 लाखपैकी तडजोडीअंती 1 लाख रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यातील 50 हजार रुपयांची लाच घेताना जाधव यांना एसीबीने सापळा कारवाईत पथकाने रंगेहात पकडला आहे.