सोपी नव्हती सचिन पायलट यांच्या प्रेमाची वाट, फारूक अब्दुलांच्या मुलीशी ‘असा’ झाला विवाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेटाईन डे साजरा होतो. अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्या प्रेमाच्या जगतात एक आदर्श ठरल्या आहेत. यामधीलच एक लव्हस्टोरी आहे राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांची. त्यांच्या प्रेमाच्या वाटेत अनेक अडचणी आल्या, परंतु दोघांनी हार मानली नाही आणि आपले प्रेम यशस्वी केले.

सचिन आणि सारा दोन मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. परंतु दोघांनी आपल्या प्रेमाचा श्वास राजकीय घराण्याच्या दबावाखाली कोंडू दिला नाही. सचिनचे हिंदू असणे आणि साराचे मुस्लिम असणे नेहमीप्रमाणे प्रेमाच्या मार्गातील मोठी समस्या होती. सचिन पायलट दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांचे पुत्र आहेत.

सचिन पायलट यांचा जन्म यूपीच्या सहारनपुरमध्ये झाला. सेंट स्टीफन कॉलेजमध्ये स्कूलिंग आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर ते यूनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्वानियाच्या वार्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए करण्यासाठी परदेशात गेले. तर सारा पायलट जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची मुलगी आणि उमर अब्दुल्ला यांची बहिण आहे. साराचे आजोबा शेख अब्दुल्ला एक लोकप्रिय नेते होते.

सारा 1990 पर्यंत काश्मीरमध्ये आपल्या परिवारासोबत रहात होती. नंतर फारूक अब्दुल्ला यांनी खोर्‍यातील तणावामुळे साराला आईसोबत लंडनला पाठवले. लंडनमध्येच सारा आणि सचिन यांची पहिली भेट झाली. सचिन आणि साराचे वडील दोघे मित्र होते. आणि एकमेकांच्या परिवाराशी परिचित होते. परंतु, दोन्ही परिवाराचे सदस्य एकमेकांना भेटले नव्हते.

एमबीए करत असताना सचिन यांची मैत्री साराशी झाली. काही काळानंतर दोघांची मैत्री आणखी वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. साराने सचिनची भेट आपल्या आईशी करून दिली. साराच्या पालकांना सचिन अगोदरपासून पसंत होते. सचिन यांचे व्यक्तीमत्व आणि त्यांचे हसणे मन जिंकणारे होते.

साराच्या कुटुंबियांना दोघांच्या मैत्रीवर आक्षेप नव्हता. परंतु, दोघांना एकमेकांसोबत राहण्यास जास्त वेळ मिळाला नाही. काही महिन्यातच सचिन यांनी आपला कोर्स पूर्ण केला आणि ते भारतात परतले, तर सारा इंग्लडमध्येच रहात होती.

जेव्हा ते एकमेकांपासून दूर गेले तेव्हा त्यांना त्यांच्या प्रेमाची जास्त जाणीव होऊ लागली. दूर राहिल्याने प्रेम आणखी वाढते असे म्हणतात. सचिन-साराच्या बाबतीतही तेच झाले. दोघे एकमेकांशी ईमेल्स आणि फोन कॉल्सद्वारे बोलत असत.

अशीच तीन वर्षे निघून गेली. यानंतर त्यांनी एकमेकांसोबत जीवभर राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, येणारी वेळ एवढी सोपी नव्हती.

दोघांची पार्श्वभूमी खुप वेगळी होती. सचिन राजस्थानच्या गुज्जर परिवारातून होते तर सारा एका पुराणमतवादी मुस्लिम कुटुंबातून होती. दोघांनाही माहित होते की घरच्यांची संमती एवढ्या सहज मिळणे अवघड आहे.

सचिन यांनी शेवटी साराच्या बाबतीत आपल्या आईला सांगितले. अपेक्षेनुसार सचिन यांच्या आईने हे नाते नाकारले. सचिन यांचे संपूर्ण कुटुंब या नात्याच्या विरोधात होते. परंतु, सचिन यांनी कसेतरी करून आपल्या कुटुंबियांना राजी केले.

मात्र, अडचणी सारासाठी जास्त होत्या. साराच्या वडीलांनी या नात्याला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. सारा वडीलांच्या खुप जवळ होती यामुळे तिला माहित होते की एक ना एक दिवस वडील हो म्हणतील.

साराने अनेक दिवस आपल्या वडीलांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. रिपोर्टनुसार, ती अनेक दिवस रडत होती परंतु, वडीलांवर कोणताही परिणाम दिसून येत नव्हता. ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. फारूक यांना सचिन पसंत होते, परंतु सामाजिक आणि राजकीय दबावापुढे ते सुद्धा हतबल होते.

जेव्हा सचिन आणि साराचे प्रेम जगजाहिर झाले तेव्हा अब्दुल्ला यांच्याविरूद्ध कॅम्पेन सुरू झाले. याचा एवढा परिणाम झाला की त्यांच्याच पक्षाचे काही आमदार त्यांच्या विरोधात गेले. त्यांचे म्हणणे होते एक मुस्लिम पुरुष आपल्या धर्माच्या बाहेर विवाह करू शकतो, पण इस्लाम एक मुस्लिम महिलेला एका गैर मुस्लिमशी विवाह करण्याची परवानगी अजिबात देत नाही.

सचिन आणि सारा यांनी काही महिने शांत राहून वाट पाहिली. परंतु, नंतर त्यांना जाणवले की महिने आणि वर्षे उलटली तरी परिस्थिती बदलणार नाही. विरोध अजूनही सरूच होता. फारूक अब्दुल्ला सुद्धा आपल्या पक्षाच्या आमादारांसमोर हतबल होते.

सचिन आणि साराला निर्णय घ्यायचाच होता. त्यांच्याजवळ दोनच पर्याय होते एक म्हणजे आपल्या कुटुंबियांच्या मर्जीसमोर झुकणे आणि आपले जीवन नशीबाच्या हवाली करणे.

सारा आणि सचिन यांनी दुसरा पर्याय निवडला. जानेवारी 2004 मध्ये दोघांनी एका साध्या सोहळ्यात विवाह केला. या विवाहासाठी खुपच कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. अब्दुल्ला कुटुंबाने या विवाहावर बहिष्कार टाकला होता. परंतु, साराला शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती की, तिचे कुटुंब हे मान्य करेल आणि सर्वकाही ठीक होईल.

साराच्या घरचे विवाहासाठी आले नाहीत. परंतु, सचिनच्या कुटुंबियांनी तिला कधीही एकटेपणा जाणवू दिला नाही. सचिन यांनीही साराला नेहमी साथ दिली.

सारा अब्दुल्ला आता सारा पायलट झाली आणि दोघांनी नवे आयुष्य सुरू केले. काही काळ गेल्यानंतर फारूक अब्दुल्ला यांची नाराजी दूर झाली आणि वडील आणि मुलीमधील नाते पुन्हा पूर्ववत झाले.

सचिन विवाहानंतर काही महिन्यात राजकारणात आले. तर, सारा यूएनमध्ये महिला सशक्तीकरणासाठी काम करत होती. सचिन आणि सारा यांना आता दोन मुले आहेत. त्यांची नावे आरान आणि वेहान आहेत. कामाच्या व्यापातही सारा-सचिन एकमेकासाठी वेळ काढतात. ते सोबत फिरण्यासाठी जातात. चित्रपट पाहतात.

सचिन आणि सारा यांच्यासाठी धर्माचाही प्रश्न राहिला नाही. साराची आई ईसाई आहे, सारा मुस्लिम आहे, आणि सचिन हे हिंदू आहेत. परंतु, आता त्यांच्या कुटुंबात धर्माबाबत काहीही समस्या नाही. सचिन-सारा यांची प्रेमकहाणी प्रेम करणार्‍यांसाठी एक चांगले उदाहरण आहे. जीवनाचे जोडीदार होण्यासाठी केवळ प्रेम असणे आवश्यक आहे, धर्म आणि जातीचा काहीही संबंध नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like