सचिन पायलट बुधवारी दिल्लीत घेणार पत्रकार परिषद, मोठया घोषणेची शक्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानचे उपमुख्यमंत्री पद आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून हटविण्यात आलेले सचिन पायलट उद्या सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे. राजस्थानच्या संपूर्ण घटनाक्रमावर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु बुधवारी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आपला मुद्दा मांडू शकतात.

एक प्रकारे बघितले गेले तर आतापर्यंत सचिन पायलट यांनी पक्ष आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरूद्ध जाहीरपणे कोणतेही विधान केलेले नाही. राजस्थानमधील कॉंग्रेसचे सरकार पाडण्याच्या षडयंत्रात स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपकडून मिळालेल्या नोटीसमुळे जरी नाराज होऊन सचिन पायलट यांनी समर्थक आमदारांसह दिल्लीत तळ ठोकला, परंतु मुख्यमंत्र्यांविरूद्ध त्यांनी कोणतेही विधान केले नाही. तथापि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायलट गट सातत्याने असे म्हणत आहे की गहलोत गट त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

खरंतर सचिन पायलट आतापर्यंत शांत राहिले आहेत. उपमुख्यमंत्रीपदावरून काढून टाकल्यापासून त्यांचे केवळ दोन ट्वीट आले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये सचिन पायलट यांनी लिहिले की खऱ्याला त्रास दिला जाऊ शकतो, त्याला पराभूत केले जाऊ शकत नाही. याशिवाय त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्येही काही बदल केले आहेत. तसेच दुसर्‍या ट्विटमध्ये ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांचे आभार मानले आहेत.

राजस्थानच्या संपूर्ण राजकीय घटनाक्रमानंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा सचिन पायलट बुधवारी पत्रकार परिषदेत बोलतील. दरम्यान, सचिन पायलट आपला मुद्दा नेतृत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसने घेतलेल्या निर्णयावर ते आपल्या आमदारांबरोबर चर्चा देखील करत आहेत.

पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

पदावरून हटविण्यात आलेले सचिन पायलट यांनी त्यांचे समर्थन करणाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. राजस्थानच्या राजकीय घटनाक्रम संदर्भात जितिन प्रसाद ते प्रिया दत्त पर्यंत सर्वांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. कॉंग्रेसच्या विविध नेत्यांनी पाठिंबा दिल्यानंतर पायलट यांनी ट्वीट केले की, ‘आज माझ्या पाठिंब्यात जे समोर आले आहेत, त्या सर्वांना हार्दिक धन्यवाद आणि आभार.’