‘मास्टर ब्लास्टर’ सचिननं ‘कोरोना’मुळं गमावला सर्वात जवळचा मित्र ! ‘भावूक’ होत सांगितल्या जुन्या आठवणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   भारताचे दिग्ग्ज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे मित्र अवि कदम यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. याबाबत स्वत: सचिन तेंडुलकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सोबतच सचिन यांनी भावूक होत अवि कदम यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे.

सचिन यांनी ट्विट करत लिहिलं की, माझा प्रिय मित्र अवि कदम यांचं निधन झालं आहे. शाळेतल्या दिवसांपासून तो माझा जवळचा मित्र होता. क्रिकेटच्या सरावानंतर शिवाजी पार्काबाहेर आमच्यात होणारी भेट माझ्या कायम लक्षात राहिल. त्याच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत असं म्हणत सचिन यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

कोरोनाची लागण झालेल्या अवि कदम यांना काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वत: सचिन यांनी डॉक्टरांना फोन करून त्यांच्या स्थितीबाबत माहिती घेतली होती. मात्र दुर्दैवानं अवि कदम यांचा मृत्यूसोबतचा संघर्ष अयशस्वी झाला.