Coronavirus : सचिन तेंडुलकरकडून ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारला दिले 50 लाख

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – सचिन तेंडुलकर लोकांना सतत कोरोना व्हायरसबाबत आवाहन करत असून आता त्याने राज्य आणि केंद्र सरकारला मदत केली आहे. खरंतर सचिनला याबाबत कोणालाच सांगायचे नव्हते पण त्याच्या जवळच्याच व्यक्तीने याबाबत जाहीर केल्यामुळे आता मात्र सचिनने अजूनही मदत का केली नाही, असा प्रश्न करणारे गप्प झाले आहेत. तर त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले कि सचिन नेहमीच समाजकार्यात पुढे असतो आणि त्याच्याकडून आर्थिक निधीही देत असतो.

सचिनने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला प्रत्येक २५ लाखांची मदत केली असून त्याला याबाबत कुठेही सांगायचे नव्हते अशी माहिती मिळत आहे. सचिनने केलेल्या ५० लाखांपैकी २५ लाखांची मदत मुख्यमंत्री मदत निधीत आणि २५ लाख पंतप्रधान मदत निधीत जाणार आहेत. तर सचिनच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “सचिनला ही मदत केल्याचे कोणालाही सांगायचे नव्हते. याअगोदरही त्याने ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत मोडलेला संसार उभा करण्यासाठी लोकांना २५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत केली आहे. तो नेहमी मदत करतो. तसेच त्याने त्याच्या खासदारकीचा पगार पंतप्रधान मदत निधीला दिला असून तो ‘अपनालय’ या NGO ला नेहमी मदत करतो.”

तसेच याअगोदर महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, इरफान आणि युसूफ पठाण यांनीही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारला मदत केली असून गांगुलीने गरजूंसाठी ५० लाख किमतीचे तांदुळ दिले, तर पठाणने मास्क वाटले आहेत. तर शिखर धवननेही मदत केली असून मुंबई क्रिकेट असोसिएशननेही राज्य सरकारला ५० लाखांचा निधी दिला आहे.