सचिन तेंडुलकरने उचलला 6 राज्यातील मुलांच्या उपचाराचा खर्च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिकेट विश्वात एका महान क्रिकेटपटू म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीपूर्वी आणि नंतरही समाजसेवा करत आहे. नुकत्याच त्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने देशातील सहा राज्यांतील गरीब मुलांच्या उपचाराच्या खर्चासाठी निधी दिला आहे. गंभीर आजाराशी संघर्ष करत असलेल्या मुलांच्या उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबीयांना उचलता येत नाही, अशा गरजूंना ही मदत मिळणार आहे.

त्याच्या या कामामुळेच तो अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.
कोरोना काळात तेंडुलकरनं एकम फाऊंडेशनच्या मदतीनं महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळ नाडू आणि आंद्र प्रदेश येथील १०० मुलांची माहिती मिळवली त्यानंतर तेंडुलकर फाऊंडेशननं त्याना आर्थिक मदत केली आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकर फाऊंडेशनबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आरोग्य विभागात सचिन चांगलं काम करत आहे,”असे एकम फाऊंडेशनच्या अमिता चॅटर्जी यांनी सांगितले.

दरम्यान, तेंडुलकर फाऊंडेशन उत्तर-पूर्व भागातील अनेक वंचित भागांमध्ये काम करते. त्याच बरोबर मध्य प्रदेशातील आदीवासींना पोषक आहार व शिक्षण पुरवण्याचे काम करते.

आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत
सचिन नेहमीच लोकांना मदत करत असतो यापूर्वी तेंडुलकरनं आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत केली आहे आणि वंचित कुटुंबातील दोन हजार मुलांना त्याचा फायदा होणार आहे. आसाममधील करिमगंज जिल्ह्यातील माकुंडा हॉस्पिटलमध्ये मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी लागणारी उपकरणं त्यानं दान केली आहेत. नवजात बालकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

माकुंडा हॉस्पिटलचे बाल विशेषज्ञ सर्जन डॉ. विजय आनंद इस्माइल यांनी या मदतीबद्दल सचिनचे आभार मानले. ‘सचिन तेंडुलकर आणि एकम या सेवाभावी संस्थेच्या मदतीने हॉस्पिटलला मोलाची मदत झाली आहे. यामुळे गरीब लोकांना कमी पैशांमध्ये चांगला सुविधा मिळू शकतील. असे त्यांनी सांगितले.

एक महान क्रिकेटपटू
सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या २०० कसोटीत १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. कसोटीत 15 हजार धावांचा पल्ला पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे. शिवाय ४६३ वन डे सामन्यांत ४४. ८३ च्या सरासरीनं १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत. त्यात ४९ शतकांचा समावेश आहे. वन डे द्विशतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे.

You might also like