अर्जुनवर घराणेशाहीची टीका, यावर सचिन तेंडुलकर म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंडियन क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्सनं आयपीएल लिलावात विकत घेतलं. अर्जुनची क्रिकेटमध्ये एन्ट्री झाल्यानंतर त्याच्यावर आणि सचिनवर घराणेशाहीचा आरोप तसंच टीका झाली. या सगळ्या टीकेवर सचिननं पहिल्यांदाच अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. अनअ‍ॅकेडमीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानंतर सचिननं पत्रकार परिषदेत या मुद्द्यांवर वक्तव्य केलं आहे.

सचिन म्हणाला की, खेळाडूला त्याच्या पार्श्वभूमीमुळं नाही तर मैदानातल्या कामगिरीमुळं ओळख मिळते. जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करतो, तेव्हा तुम्ही कुठून आलात, तुम्ही देशाच्या कोणत्या भागातून आलात, तुमचं कोणासोबत काय नातं आहे या गोष्टींना महत्त्व उरत नाही. खेळाच्या मैदानात प्रत्येकासाठी परिस्थिती सारखीच असते. इकडे कामगिरीशिवाय कोणत्या गोष्टीनं फरक पडत नाही.

पुढं बोलताना सचिन म्हणाला, खेळ लोकांना एकत्र आणतो. तुम्ही एक व्यक्ती म्हणून तिकडं असता. टीमसाठी योगदान द्यायचं, हेच आमच्या डोक्यात असतं. मी वेगवेगळ्या शाळा आणि बोर्डाचा भाग असल्यामुळं वेगवेगळ्या प्रशिक्षकांना भेटतो, मी स्वत: यातून शिकतो आणि अनुभव शेअर करतो असंही तो म्हणाला.

विद्यार्थ्यांनी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी मेहनत करावी. स्वप्नांचा पाठलाग करा. कारण ती पूर्ण होतात, अनेकवेळा आता काहीच होऊ शकत नाही असं वाटतं, परंतु असं कधीच होत नाही. जास्त मेहनत केलीत तर एक दिवस ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल असा सल्लाही सचिननं दिला.