वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरचा संकल्प अन् चाहत्यांना घातली साद, म्हणाला – ‘मी प्लाझ्मा देणार, तुम्हीही दान करा’

पोलीसनामा ऑनलाइनः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतीच कोरोनावर मात केली आहे. तो आज 48 वा वाढदिवस साजरा करत असून वाढदिवसानिमित्त तेंडुलकरने प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला आहे. तसेच त्यांनी चाहत्यांनाही प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त सचिनवर सोशल मीडियाच्या माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिनने शुभेच्छा देणा-या सर्व चाहत्यांचे एक व्हिडीओ पोस्ट करून आभार मानले आहेत.

सचिनने व्हिडीओत म्हटले आहे की, मला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. तुमच्या शुभेच्छांनी माझा आजचा दिवस आणखी खास झाला. गेला महिना माझ्यासाठी खडतर होता. मला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे मी 21 दिवस आयसोलेट होतो. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा, माझ्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या प्रार्थना व शुभेच्छा आणि डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ ज्यांनी माझ्यात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण करून मला बरे केले. त्या सर्वांचे खूप आभार असे तो म्हणाला.

व्हिडीओत सचिनने त्याचा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला असून इतरांनाही त्याने आवाहन केले आहे. गेल्यावर्षी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये सचिनच्याच हस्ते प्लाझ्मा डोनेशन केंद्राचे उद्घाटन झाले होते. ज्यांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा हा सक्रिय रुग्णांना बरे करण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरत आहे. योग्यवेळी प्लाझ्मा दिला तर रुग्ण लवकर बरा होतो, असे सचिन म्हणाला.