‘तुझे करिअर संपवेन, सचिनने ‘दादा’ला दिली होती धमकी’

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय संघाची आतापर्यंतची वन-डे क्रिकेट मधली सर्वोत्तम सलामीची जोडी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली होती. 90 च्या दशकात हे सर्व क्रिकेटपटू भारतीयांच्या गळ्यातले ताईत होते. सचिन, सौरव, द्रविड, लक्ष्मण यांची फलंदाजी पाहण्यासाठी लोक टिव्हीसमोर ठाण मांडून बसत होते.

सचिन आणि सौरव गांगुली यांच्यातला याराना सर्वांना माहिती आहे. अनेकदा सोशल मीडियावर आपण याची प्रतिचीही घेतली आहे.
परंतु कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात 1997 साली विंडीज दौर्‍यात सचिन आणि सौरव यांच्यात एक वाद झाला होता. ज्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार्‍या सचिन तेंडुलकरने ‘दादा’ला करिअर संपवेन अशी धमकी दिली होती.

बार्बाडोस कसोटीत भारताला वेस्ट इंडिजकडून मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. विजयासाठी 120 धावसंख्येचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरची टीम इंडिया 81 धावांत गारद झाली होती. 38 धावांनी भारताने हा सामना गमावला. या पराभवामुळे सचिनला चांगलाच धक्का बसला होता. हातात आलेला सामना, भारताने गमावला होता. यावेळी सौरव गांगुली आपल्या कर्णधाराला धीर देण्यासाठी गेला असता त्याला सचिनच्या रागाचा सामना करावा लागला. सचिनने त्यावेळी सर्व खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये उपदेशाचे धडे दिले. यावेळी त्याला स्वतःच्या क्षमतेवरही शंका येत होती. यावेळी सौरव सचिनला धीर द्यायला गेला असतान सचिनने त्याला उद्यापासून सकाळी माझ्यासोबत धावायला यावे लागेल, तयार रहा असे सांगितले होते. मात्र गांगुली सचिनसोबत धावायला गेलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या सचिनने गांगुलीला, असा हलगर्जीपणा चालणार नाही. तुझी बॅग घेऊन घरी पाठवेन आणि कारकिर्द संपवेन अशी धमकी दिली होती. यू-ट्युब व्हिडीओमध्ये क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी हा किस्सा सांगितला आहे. सचिनच्या या रागवण्याचे गांगुलीने कधीही वाईट वाटून घेतले नाही. यानंतरही सचिन आणि गांगुली या जोडीने भारताला अनेक सामने जिंकवून दिले. या जोडीच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. 2008 साली गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर सचिनने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.