माणुसकीला ‘सॅल्यूट’ ! ‘सचिन’ आणि ‘स्टीव वॉ’ नं साजरा केला भारतातील सर्वात ‘वयस्कर’ क्रिकेटरचा 100 वा ‘बर्थडे’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपण क्रिकेट जगतात क्रिकेटपटू आपल्यापेक्षा लहान-मोठ्या सहकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करताना पाहतो. अशाच प्रकारचा वाढदिवस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आज साजरा केला आहे. रणजी क्रिकेटपटूपैकी सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे वसंत रायजी यांचा आज वाढदिवस आहे.

वसंत रायजी यांचा जन्म 26 जानेवारी 1920 रोजी झाला. त्यांचा आज 100 वाढदिवस असून हा वाढदिवस साजरा करण्यासाठी सचिन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ त्यांच्या दक्षिण मुंबईतील घरी पोहचले. रायजी यांनी 1940 च्या दशकात 9 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 277 धावा केल्या. यामध्ये 68 ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. भारतानं बॉम्बे जिमखान्यात पहिला कसोटी सामना खेळला त्यावेळी रायजी केवळ 13 वर्षांचे होते. भारतीय क्रिकेट प्रवासाचे ते साक्षीदार आहेत. त्यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

सचिनने व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत लिहले आहे की, वसंत रायजी तुम्हाला या 100 व्या विशेष वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. स्टीव्ह आणि मला तुमच्याकडून भूतकाळातील क्रिकेटमधील मजेदार गोष्टी ऐकून खूप छान वाटले. आमच्या लाडक्या खेळाविषयीच्या आठवणींचा खजिना दिल्याबद्दल धन्यवाद.
त्याचबरोबर आयसीसीनेही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रायजी यांच्या 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये आयसीसीने लिहले आहे की, भारताचे प्रथम श्रेणीचे वयस्कर क्रिकेटपटू आज 100 वर्षाचे झाले ! माजी रणजीपटू व क्रिकेट इतिहासकार वसंत रायजी यांचे एक खास शतक.

फेसबुक पेज लाईक करा –