सचिन तेंडुलकरने सर्व आरोप फेटाळले ; बीसीसीआयच्या नोटीशीला दिले ‘हे’ उत्‍तर

मुंबई : पोलीसनाम ऑनलाइन – बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या कुठल्याही नियमांचे उल्‍लंघन माझ्याकडून झालेले नाही, तसेच मी मुंबई इंडियन्स IPL संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही, असे स्पष्टीकरण देत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी पाठविलेल्या नोटीशीला दिलेल्या उत्‍तरात सचिनने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

मी मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक असून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या नियमावलीत नमुद केलेल्या कुठल्याही पदावर काम करीत नसल्याचे सचिनने त्या 14 मुद्दयांचा समावेश असलेल्या लेखी उत्‍तरात लिहीले आहे. माझ्याकडे असलेल्या अनुभवानुसार मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाला योग्य मार्गदर्शन करणे हे माझे काम असुन हा केवळ मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचा भाग असल्याचे सचिनने म्हंटले आहे. बीसीसीआयच्या नियम 38 (4) (जे) मध्ये नमुद केल्याप्रमाणे ‘गव्हर्नन्स’, ‘मॅनेजमेंट’ आणि ‘एम्ल्पॉयमेंट’ याच्याशी संबंधित एकही पद मी भूषवित नसल्याचे देखील सचिनने स्पष्टीकरणात नमुद केले आहे.

एवढेच नव्हे तर दिलेल्या योगदानाचा आपण संघाकडून मोबदला घेत नाही, संघाचे कोणतेही अधिकृत कार्यालयीन पद स्विकारलेले नाही असेही सचिनने स्पष्ट केले आहे. संघाबद्दल कुठलाही निर्णय घेण्याची जबाबदारी आपल्यावर नसल्याचेही सचिनने सांगितले आहे. त्यामुळे हितसंबंधाचा कोणताही मुद्दा उपस्थित होत नसल्याचे सचिनने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना हितसंबंधांच्या मुद्दयावरून नोटीस बजावली होती. त्यानंतर बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी नाराज झाले होते. सचिन आणि लक्ष्मण यंना नोटीस पाठवायला नको ही असे अनेकांचे म्हणणे होते. सचिन हा मुंबई इंडियन्सचा तर लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक आहे.