सचिन तेंडुलकरचे गुरू ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर यांचं निधन

मुंबई : वृत्तसंस्था – भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू म्हणजे रमाकांत आचरेकर. आचरेकरांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
आचरेकर हे 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. या सर्व खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले आहे. त्यांच्या जाण्याने क्रिकेच जगतात शोककळा पसरली आहे.
आचरेकर सरांचा जन्म 1932 सालचा आहे. त्यांनी 1943 साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी यंग महाराष्ट्रा एकादश. गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी केवळ एक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैद्राबादविरुद्ध सामना खेळला होता.