राज्याला मिळणार नवीन गृहमंत्री? ‘या’ 2 दिग्गजांच्या नावाची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना NIA ने अटक केल्यानंतर ठाकरे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गृहखात्यावर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रिपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर गृहमंत्रिपदी आता राष्ट्रवादीतीलच एका दिग्गज नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे याबाबत येत्या काही दिवसात काय घडामोडी घडतात, हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राज्यात अनेक घटनांवरून गदारोळ झाला. यामध्ये पालघऱ हत्याकांड, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या आणि आता सचिन वाझे प्रकरण महाविकास आघाडी सरकारसाठी अडचणीचे ठरले. या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या नावाची चर्चा सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून दोन नावांचा मुख्यत्वे विचार होत असल्याची माहिती समोर येत आहे. वाझे प्रकरणामुळे सरकारची अडचण झालेली असताना डॅमेज कण्ट्रोलसाठी गृहमंत्रिपदी आता दुसऱ्या नेत्याची निवड होऊ शकते. यामध्ये सध्या अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावं आघाडीवर असल्याची प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी दिली आहे.