सचिन वाझे प्रकरण 100 नव्हे तर 1000 कोटींचं? आणखी कोण-कोणत्या यंत्रणा करणार तपास?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होतेे, असा सनसनाटी आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपने थेट संसदेपर्यंत हा मुद्दा लावून धरत ठाकरे सरकारची कोंडी केली आहे. त्यातच आता भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी बुधवारी (दि. 24) ईडीच्या अधिका-यांची भेट घेतली आहे. हे प्रकरण 100 कोटीचे नव्हे तर 1 हजार कोटीचे असल्याचे सांगत याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सोमय्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. 1 हजार कोटींहून अधिकच्या सचिन वाझे खंडणी गँगसंदर्भात आज ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यात बेनामी, ऑफशोर, रोकड व्यवहारांचा समावेश आहे. या प्रकरणी अनिल देशमुख, परमबीर सिंग, अनिल परब यांची चौकशी गरजेची आहे. ईडी या व्यवहारांची चौकशी करेल अशी आशा असल्याचे सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच वाझे गँगने 1 हजार कोटीची वसूली केली. मात्र ते पैसे कुठे गेले याची चौकशी एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, कंपनी मंत्रालय आणि आयकर विभागाने करण्याची आवश्यकता असल्याचे सोमय्या म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात केंद्राच्या आणखी तपास यंत्रणा लक्ष घालण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळल्याचा कारचा तपास एनआयएने हाती घेतल्यानंतर बरीच माहिती समोर आली आहे.