×
Homeपोलीस घडामोडीसचिन वाझे प्रकरणाचा धसका घेतल्यामुळे कारवाया थंडावल्या !

सचिन वाझे प्रकरणाचा धसका घेतल्यामुळे कारवाया थंडावल्या !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून खळबळ उडाली आहे. रोज नवनवी माहिती समोर येत आहे. तर पोलिसानेच स्फोटके ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आल्यानंतर मुंबई पोलिस दल हादरून गेलं आहे. वाझे यांच्यासह आणखी काही पोलीस अधिकारी यांची नावे समोर येत असल्याने, यावरून पोलिसांनी या प्रकरणाचा धसका घेतला आहे. तर काही स्थानिक पोलिसांची कारवाई सोडून मुंबई पोलिस दलामधील मोठ्या कारवाया थांबल्याचे दिसते.

तसेच, पोलिस आणि गुन्हे शाखेच्या कार्याची पत्रके, आणि आता पत्रकार परिषदांना ब्रेक लागला आहे. पोलिसांची प्रतिमा धुळीस मिळविणाऱ्या या प्रकरणात पुढे काय घडते ? आणखी कोणत्या अधिकाऱ्याचा सहभाग आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच सचिन वाझे यांना हे सर्व करण्यासाठी पोलिस दलात असलेल्या त्यांच्याच गटातील काहींनी सहकार्य केल्याचे म्हटले आहे. यामध्ये, मुंबईसह ठाण्यातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समजते. मात्र, NIA आणि ATS च्या रडारवर हे अधिकारी असून, त्यांना कधीही चौकशीसाठी सामोरे जावे लागू शकते.

मुंबईमध्ये ९४ पोलिस स्टेशन आहे. गुन्हे शाखेची (Crime Branch) जवळजवळ १५ युनिट्स आहेत. यासह नव्याने सायबर पोलिस ठाणी सुरू करण्यात आली आहे. तर मुंबईत दररोज घडणाऱ्या घटना, गुन्हे यांचे प्रमाण बघता पोलिसांकडून अनेक प्रकारच्या कारवाया सुरूच असतात. परंतु, सचिन वाझे प्रकरणामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची मानसिकता नसल्याने पोलिस विनाकारण कोणते प्रकरण बाहेर काढण्यासाठी समोर येत नाहीत. म्हणून, त्यातच एखादी साधी चूकही मुंबई पोलिस दलास आणखी अडचणीत आणू शकते त्यामुळे सावधगिरीने काम करा, असे मुंबईचे नूतन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितल्याने मुंबई पोलिस दल आता सावधगिरीचे पाऊल टाकताना दिसत आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारीला जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. आणि सर्व यंत्रणा जाग्या झाल्या, मुंबई पोलिस दल आणि गुन्हे शाखा देखील या घटनेमुळे खडबडून जागी झाली. तपासादरम्यान या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिस दलासाठी हा त्याहून मोठा धक्का होता. याच प्रकरणामुळे मुंबईचे मावळते पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली. वाझेंसोबत यामध्ये आणखी काही पोलिस सहभागी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेने आता प्रचंड धसका घेतला आहे. तर यावरून मुंबई पोलिस दलातील प्रत्येक जण वाझे प्रकरणामुळे दडपणाखाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Must Read
Related News