Sachin Vaze Case : सचिन वाझेंच्या नव्या दाव्यानं प्रचंड खळबळ; कोणाच्या फायद्यासाठी रचला कट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ लावण्यात आली. एवढेच नाही तर एक इनोव्हाही या स्कॉर्पिओच्या मागून गेली होती. एनआयएच्या तपासात या इनोव्हामध्ये सचिन वाझे असल्याचे समोर आले असून त्यांनीच हा कट रचल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र दोन प्रश अजूनही अनुत्तरीतच आहेत ते म्हणजे या कटामागील कारण आणि कोणाला याचा फायदा होणार? सध्या यावरच ऊलटसुलट चर्चा सुरु आहे. काहींनी तर अनेक तर्क लावले आहेत.

विधानसभा अधिवेशनावेळी विरोधकांनी सचिन वाझे प्रकरण उचलून धरल्याने राज्यतील वातावरण तापले आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांचा हात आणि वरदहस्त असल्याचे आरोप करण्यात आल्याने यामध्ये आणखी भर पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील वाझेंची बाजू उचलली होती. तर दुसरीकडे करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. मात्र, या प्रकरणात एनआयएची एन्ट्री झाली आणि सारे चित्रच बदलले. एनआयएच्या तपासात वाझेच या कटाचे सूत्रधार असल्याचे समोर आले.

सचिन वाझेंना अटक करण्यामागे मिळालेले परिस्थितीजन्य पुरावे आहेत. सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, घटनास्थळावरील पुरावे नष्ट करणे, मनसुख हिरेनचा मृतदेह सापडणे, त्यानंतर वाझेंचे त्याचाशी असलेले संबंध तसेच हिरेन कुटूंबियांनी वाझेनवर केले आरोप आदी बाबीं समोर आल्याने वाझेंचा पाय आणखी खोलात गेला. मात्र, यानंतर खरी चर्चा सुरु झाली ती वाझेंनी असे का केले असावे….

वाझेंवर अनेक आरोप करण्यात आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला देणग्यांसाठी फायदा व्हावा म्हणून वाझेंनी असे केले असावे त्याचबरोबर इमारतीवर अंबानींना हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी मिळत नाहीय, ती मिळविण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचे देखील दावे केले गेले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने वाझेंनीच स्वत:साठी अंबानींच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली कार लावल्याचे म्हंटले आहे.

एकेकाळचे खतरनाक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सचिन वाझे ओळखले जात होते. २००४ मध्ये पोलीस कोठडीत ख्वाजा युनुस नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, या प्रकरणात वाझे निलंबित झाले होते. तब्ब्ल १६ वर्षे ते बाहेर होते. २०२० मध्ये शिवसेनेची सत्ता येताच पुन्हा त्यांना पोलीस सेवेत घेण्यात आले. या रिपोर्टमध्ये गेलेले जुने दिवस, प्रसिद्धी आणि तेव्हाचा रुबाब परत मिळविण्यासाठी वाझेंनी हा कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे.